Muramba upcoming twist: ‘मुरांबा’ या मालिकेतील रमा अक्षय ही जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. आता त्यांच्याबरोबरच त्यांची लाडकी लेक आरोहीदेखील प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे.

मालिकेत सात वर्षांच्या लीपनंतर रमा व अक्षय यांची आयुष्ये एका वेगळ्या वळणावर आल्याचे पाहायला मिळाले. आरोही सात वर्षांची झाली आहे. रमा व अक्षय वेगवेगळ्या शहरांत राहत असल्याचे पाहायला मिळाले. पण, कामाच्या निमित्ताने त्यांची पुन्हा एकदा भेट झाली. आरोही तिची मुलगी आहे हे रमाला समजले. आता मालिकेत ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘मुरांबा’ मालिकेत पुढे काय घडणार?

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘मुरांबा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की आरोही तिच्या वडिलांकडे म्हणजेच अक्षयकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील गणपतीची प्रतिष्ठापना करू असा आग्रह धरते, पण अक्षय तिला नकार देतो.

आरोही अक्षयला म्हणते, “बाबा, उद्या बाप्पाचं आगमन आहे. आपण यावर्षीसुद्धा आपल्या घरी…”, तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच अक्षय तिला थांबवतो आणि म्हणतो, “नाही, आरु यावर्षी आपल्या घरी बाप्पाचं आगमन होणार नाही.” अक्षय निघून गेल्यानंतर आरोही गणपतीपुढे हात जोडून म्हणते, “बाप्पा, प्लीज ये ना. यावर्षी माझ्या आईला घेऊन ये ना.” अक्षय व आरोहीचे बोलणे रमा ऐकते.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की रमा ढोल ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत गणपती बाप्पाची मूर्ती स्वत: घेऊन येते. आरोही घरातून बाहेर पळत येते. आनंदाने व उत्साहाने ती उड्या मारते. आवाज ऐकून घरातील सर्व मंडळी बाहेर येतात. आरोही रमाकडे पळत जाते. रमा गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करते, तर अक्षय व इतर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसत नाही.

हा प्रोमो शेअर करताना, “गणपती बाप्पा घरातच नाही तर मनातसुद्धा आनंद घेऊन येतो”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, रमा व अक्षय यांच्यातील गैरसमज कधी दूर होणार, आरोही त्यांना एकत्र आणणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.