ही अभिनेत्री २००० च्या दशकात भारतीय टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक होती. एकता कपूरच्या ‘कहीं तो होगा’ या हिट शोमध्ये कशिश सुजल गरेवालची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या या मुस्लीम अभिनेत्रीला अभिनयविश्वात यायला संघर्ष करावा लागला होता. एका रूढीवादी मुस्लीम कुटुंबातील या अभिनेत्रीने नंतर हिंदू बॉयफ्रेंडशी लग्न केलं आणि आता ती आनंदाने संसार करतेय.
या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव आमना शरीफ. आमनाचा जन्म १६ जुलै १९८२ रोजी मुंबईत झाला. तिचे वडील भारतीय तर आई पर्शियन-बहरैनी आहे. हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत आमना म्हणाली, “मला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं, पण मी एका अतिशय रूढीवादी मुस्लीम कुटुंबात जन्मले. माझे वडील खूप लवकर वारले, त्यामुळे फक्त मी आणि माझी आईच होतो.”
“कुटुंबातील कोणीही अभिनयक्षेत्रात जाईल, असा विचार कोणीच केला नव्हता. मीही सुरुवातीला या क्षेत्रात यायचं नाही असं ठरवलं. कारण परिस्थिती अशी होती की मला शिक्षणासाठी बुटिकमध्ये काम करावं लागत होतं,” असं आमना म्हणाली.
म्युझिक व्हिडीओंमध्ये केलं काम
आमनाने मॉडेलिंग व जाहिरातींमधून करिअरची सुरुवात केली. तिने कुमार सानू, फाल्गुनी पाठक, दलेर मेहंदी यांच्यासाठी व्हिडीओ केले. “शेवटी सगळं नशिबावर असतं. मी कॉलेजमध्ये असताना मला एका जाहिरातीची ऑफर आली. मी हिंमत एकवटून आईची परवानगी मागितली. माझ्या आईने नकार दिला, पण मी सहा महिने तिची मनधरणी केली. शेवटी तिने कुटुंबाच्या विरोधात जाऊन मला होकार दिला,” असं आमना म्हणाली.
“कुटुंबातील कोणीच आईबरोबर २ वर्षे बोलत नव्हतं. मी नंतर म्युझिक व्हिडीओ केले, बऱ्याच जाहिराती केल्या. मला एकता कपूरने पाहिलं आणि ऑडिशनसाठी बोलावलं. तिथून माझा प्रवास सुरू झाला. मी तिची खूप आभारी आहे. माझ्या आईचा माझ्यावर विश्वास होता,” असं आमनाने नमूद केलं.
बॉलीवूडमध्ये अपयश आल्याने टीव्हीवर परतली आमना
२००७ मध्ये एकता कपूरची ‘कहीं तो होगा’ हा यशस्वी मालिका संपल्यावर आमनाने बॉलीवूडमध्ये नशीब आजमावलं. ‘आलू चाट’, ‘आओ विश करें’ आणि ‘शकल पे मत जा’ हे चित्रपट तिने केले, पण ते बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. यानंतर ती ‘होंगे जुदा ना हम’ या शोद्वारे पुन्हा छोट्या पडद्यावर परतली. पण या टीव्ही मालिकेचा टीआरपी खूपच कमी होता. त्यामुळे सहा महिन्यांतच मालिका बंद झाली.
आमना शरीफचं आंतरधर्मीय लग्न
आमना शरीफने २०१३ साली बॉयफ्रेंड अमित कपूरशी आंतरधर्मीय लग्न केलं. अमित निर्माता आहे. या जोडप्याने २०१५ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. दोघेही मुलाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आमना हिंदू व मुस्लीम दोन्ही धर्माचे सण साजरे करते आणि फोटोही पोस्ट करते.
आमना शरीफचे पुनरागमन
आमनाने लग्नानंतर सहा वर्षांचा ब्रेक घेतला आणि २०१९ मध्ये कसौटी जिंदगी की २ मधून पुनरागमन केले. यानंतर तिने २०२२ मध्ये हंगामा प्ले वरील ‘डॅमेज्ड सीझन 3’ आणि वूट सिलेक्ट वरील ‘आधार इश्क’ या दोन वेब सीरिजमध्ये काम केले.