एका लोकप्रिय अभिनेत्रीने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. या अभिनेत्रीच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. पण तिला मूल नकोय. तिने तिच्या या निर्णयाबद्दल स्वतःच सांगितलंय.

ही अभिनेत्री म्हणजे ‘पक पक पकाक’मधील साळू अर्थात नारायणी शास्त्री होय. नारायणी शास्त्रीने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘पिया का घर’ व ‘लाल बनारसी’ सह इतर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. नारायणीला टेलिव्हिजन इंडस्ट्रीत २५ वर्षे झाली आहेत. नारायणी आता ४७ वर्षांची आहे. पण तिला आई व्हायचं नाही. तिच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. नारायणीने २०१५ मध्ये बॉयफ्रेंड स्टिव्हन ग्रेव्हरशी लग्न केलं होतं. स्टिव्हन ब्रिटिश नागरिक असून तो मागील अनेक वर्षांपासून भारतात राहत आहे.

नारायणी व स्टिव्हन एकमेकांबरोबर खूप आनंदी आहेत. पण त्यांना मूल नको आहे. त्यांना आई-वडील व्हायचं नाही. इ-टाइम्सशी बोलताना नारायणी शास्त्रीने तिला आई का व्हायचं नाही, यामागचं कारण सांगितलं होतं. “आम्हाला मूल नको हा आम्ही खूप विचार करून घेतलेला निर्णय आहे,” असं नारायणी शास्त्री म्हणाली होती.

मी मुलांऐवजी काम करण्याचा पर्याय निवडला – नारायणी

“मुद्दा फक्त मुलांना या जगात आणण्याबद्दल नाही. तर त्यांचे पालन-पोषण करणे आणि त्यांना चांगली व्यक्ती बनवणे हादेखील आहे. खूप साऱ्या महिला आहेत, ज्या काम करता करता मुलं सांभाळतात. पण माझ्यासाठी हे खूप कठीण काम आहे. मी मुलांऐवजी काम करणं हा पर्याय निवडला आहे आणि याचा मला काहीच पश्चात्ताप नाही,” असं नारायणीने म्हटलं होतं.

“मी स्वतःशी खूप प्रामाणिक आहे. मी कोणालाही काहीही सिद्ध करण्यासाठी कोणतीच गोष्ट करत नाही. जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी माझ्या पतीशी पालकत्वाबद्दल बोलले होते. माझ्याकडे पाळीव प्राणी आहेत ज्यांच्यावर मी खूप प्रेम करते. मला कामाची खूप आवड आहे आणि म्हणूनच मी या टप्प्याचा आनंद घेत आहे. मुलं खूप प्रेमळ असतात, पण मला मुलं नको हा माझा निर्णय आहे,” असं नारायणी शास्त्री म्हणाली होती.