Navari Mile Hitlerla Fame Aalapini Nisal Shares the Meaning Of Her Unique Name : ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे आलापिनी निसळ. आलापिनी सोशल मीडियावरील तिच्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत असते. अशातच तिनं नुकतंच ‘आस्क मी’ हे सेशन घेतलं आहे. त्यामध्ये तिला अनेकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. यादरम्यान अभिनेत्रीला तिच्या नावाबद्दलही विचारण्यात आलेलं. आता तिनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

आलापिनी निसळ सोशल मीडियावर सक्रिय असते. ती वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य करीत तिचे व्हिडीओ त्यामार्फत पोस्ट करत असते. तिच्यासह ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजही अनेकदा या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळते. वल्लरी व आलापिनी यांच्या डान्स व्हिडीओला सोशल मीडियावर नेहमी सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. दोघीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.

आलापिनीने सोशल मीडियावर घेतलेल्या सेशनमध्ये तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये एका चाहत्यानं तिला “तुझं नाव कोणी ठेवलं, खूप वेगळं नाव आहे”, असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिनं तिच्या आजीचा व्हिडीओ पोस्ट करीत तिच्या नावामागचा अर्थ सांगितला आहे. आलापिनीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या आजीला ती म्हणाली, “ही माझी आजी आणि हिनं माझं नाव आलापिनी ठेवलं. पुढे अभिनेत्रीनं तिच्या आजीला तू माझं नाव आलापिनी का ठेवलंस, असं विचारलं. त्यावर तिच्या आजी म्हणाल्या, “घरामध्ये गायनाची पार्श्वभूमी होती आणि त्यामुळे त्याच्याशी संबंधित नाव ठेवायचं, असं माझ्या मनात नक्की झालेलं होतं.”

अभिनेत्रीच्या आजीने सांगितला आलापिनी नावामागचा अर्थ

आलापिनीच्या आजी पुढे म्हणाल्या, “आलापिनीमध्ये आलापी आलं म्हणजे गाणं आलं आणि त्यातूनही आलापिनी म्हणजे मुलगी. मुली खूप बोलतात, स्वत:ला व्यक्त करतात. तर आलापिनी म्हणजे उत्तम रीतीनं व्यक्त होणारी. म्हणून नाव आलापिनी ठेवलं.”

दरम्यान, आलापिनीबद्दल बोलायचं झालं, तर ती खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आली ते तिच्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील भूमिकेमुळे. त्यामध्ये तिनं मुख्य नायिकेच्या म्हणजेच वल्लरी विराजच्या ऑनस्क्रीन बहिणीची भूमिका साकारलेली. ही तिची पहिलीच मालिका होती; परंतु यातील रेवती या भूमिकेतून तिनं प्रेक्षकांची पसंती मिळवली. आता आलापिनी पुढे कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.