‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने गेले एक दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. लीला-एजे यांच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. कलाकारांची मोठी फौज असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका म्हटलं की, १४-१५ तास चित्रीकरण सुरू असतं, त्यामुळे कलाकारांना स्वत:साठी फार कमी वेळ उरतो. म्हणून आता मालिका संपल्यानंतर कलाकारांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वत:करता थोडा वेळ मिळाला आहे.
अशातच ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिका संपल्या संपल्या थेट भूतान गाठलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मालिकेत लीलाच्या धाकट्या बहिणीची (रेवतीची) भूमिका साकारणारी अभिनेत्री आलापिनी निसळ भूतानला गेल्याचं पाहायला मिळतं. आलापिनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून तिच्या कुटुंबीयांबरोबर भूतान फिरत आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने तेथील तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. भूतानच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आलापिनी छान वेळ घालवत आहे. भूतानमधील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या माणसांबरोबर ती फिरताना दिसते. यावेळी तेथील निसर्गरम्य ठिकाणांचे फोटोही तिने शेअर केले आहेत. यावर अभिनेत्री वल्लरी विराज, सानिका काशिकर यांनी कमेंट केल्या आहेत.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका सुरू असताना वल्लरी व आलापिनी दोघी खऱ्या आयुष्यातही एकत्र राहायच्या. मालिकेदरम्यान दोघींमध्ये घट्ट मैत्री झाली होती. दोघी मालिकेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही सख्ख्या बहिणींसारख्याच राहताना दिसायच्या. त्या दरम्यान दोघी अनेकदा रील बनवत असत. दोघींनाही नृत्याची प्रचंड आवड आहे. वल्लरी व आलापिनी यांनी बनवलेल्या रीलचं प्रेक्षकही भरभरून कौतुक करत असत.
आलापिनी निसळच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘नवरी मिळे हिटलरला’ ही तिची पहिलीच मालिका. यामध्ये तिने मुख्य नायिका लीलाच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर रेवतीच्या भूमिकेमुळे आलापिनी प्रसिद्धीझोतात आली. अभिनयाव्यतिरिक्त आलापिनीला नृत्याची व गायनाची आवड आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा तिने गायलेल्या गाण्याचे, तसेच कवितांचे रील पोस्ट करत असते. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेनंतर आता आलिपिनी कोणत्या नवीन भूमिकेत झळकणार हे पाहणं रंजक ठरेल.