Navari Mile Hitlerla Fame Actress Shared A Post On Her Onscreen Sister Vallari Viraj’s Birthday : अभिनेत्री वल्लरी विराजचा आज वाढदिवस. वल्लरी ‘झी मराठी’वरील ‘नवरी मिळे हिटलरला’मधून घराघरांत पोहोचली. ही तिची पहिलीच मालिका. पण, पहिल्याच मालिकेतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. आज अभिनेत्रीचा वाढदिवस असल्यानिमित्त या मालिकेतील तिच्या ऑनस्क्रीन बहिणीने तिच्यासाठी खास पोस्ट केली आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये वल्लरीने लीला ही भूमिका साकरलेली तर यामध्ये तिच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री आलापिनी निसळ झळकली होती. या दोघींची मालिकेदम्यान घट्ट मैत्री झाली. अनेकदा या दोघी मालिकेच्या सेटवरील रील, फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असत; तर आता मालिका संपल्यानंतर या दोघी एकमेकींबरोबरचे रील शेअर करत असतात.

आलापिनीने आज वल्लरीच्या वाढदिवसाचं अवचित्य साधून तिच्यासाठी एक खास पोस्ट करत तिच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला तिने मोठं कॅप्शन देत वल्लरीसाठी तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आलापिनी यामधून म्हणाली, “मी कुठेतरी असं वाचलेलं की, आपल्याला लोक आवडण्यामागे कारण असतं. वल्लरी तू मला आवडतेस, कारण तू मला एक चांगली व्यक्ती होण्यास मदत करतेस; तू कायम माझ्यासाठी उभी असतेस.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला तुझी गरज आहे आणि काही वेळेला तू माझ्यापेक्षाही जास्त मस्ती करतेस आणि मला माझ्या आवडीचे गोड पदार्थ खाऊ देत नाहीस, तरीसुद्धा माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या डोक्यात सतत काहीतरी सुरू असतं, त्यामुळे मला अनेकदा गोष्टी पुन्हा पुन्हा तुला सांगाव्या लागतात. तुझं माझ्यापेक्षा जास्त मिश्टीवर प्रेम आहे. आय लव्ह यू. मला तुझी खूप आठवण येते. तू फक्त माझी मैत्रीण नसून माझ्या आईसारखी आहेस.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आलापिनीबद्दल बोलायचं झालं तर आलापिनीने ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमध्ये रेवती मोहिते हे पात्र साकारलं होतं. ही तिची पहिलीच मालिका होती. एक वर्षाहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. यामधून तिला मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली, यामुळे तिची वल्लरी विराजसह मैत्री झाली.