Navri Mile Hitlerla Fame Actress Expresses Regret: ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. मात्र, आता ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

‘नवरी मिळे हिटलरला‘ मालिकेचे शूटिंग संपले असल्याचे कलाकारांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडिया, मुलाखती यांच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मालिकेतील कलाकारांबरोबर असलेले बॉण्डिंग, मालिकेतील आवडते सीन तसेच प्रेक्षकांकडून भरभरून मिळणारे प्रेम याबाबत कलाकार व्यक्त होताना दिसत आहेत.

मालिका संपणार असल्याचे समोर येताच प्रेक्षकांनी ही मालिका संपू नये, अशी विविध माध्यमातून विनंती केल्याचे पाहायला मिळत आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘नवरी मिळे हिटलरला’ संपवू नका हे ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळाले होते. इतकी लोकप्रिय मालिका अचानक संपत असल्याने प्रेक्षकांना अनेक प्रश्नही पडल्याचे पाहायला मिळाले.

‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

आता ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत दुर्गाच्या भूमिकेत दिसणाऱ्या शर्मिला शिंदेने एका मुलाखतीत मालिका संपण्याबाबत वक्तव्य केले आहे. मराठी मनोरंजन विश्वला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला शिंदे म्हणाली, “कुठलीही मालिका सुरू झाल्यानंतर कधीतरी संपतेच, त्यात काही वादच नाही. पण, जितकी अपेक्षा केली होती, या गोष्टीत करण्यासारखं खूप काही होतं; त्यामुळे ही मालिका तीन-चार वर्षे सुरू राहील असं मला तरी वाटलं होतं. तर तितका टप्पा पूर्ण न करताच मालिका थोडी लवकर संपते, तेव्हा दु:ख या गोष्टीचं होतं की, एखादं पात्र सापडण्यासाठी, पूर्णपणे समजण्यासाठी वेळ लागतो. असं नाही की पहिल्या दुसऱ्या दिवशी पात्र समजतं. एखादं पात्र पूर्णपणे समोर यायला वर्ष जातंच.”

“आता कुठेतरी त्या पात्रांना आता पुढे काय करायचं हा उद्देश मिळाला होता. ते सापडलं आणि मालिका बंद होत आहे. आता हे पात्र मला पुन्हा करता येणार नाही. एखादं पात्र जेव्हा मी निवडते, तेव्हा मी ते तीन-चार वर्ष करते. तेव्हा असं होतं की, त्या पात्राला मी न्याय दिला. मी प्रयत्न केला. मालिका संपली तरी मी त्या पात्राचं जितकं आयुष्य होतं ते मी जगते. आता ‘नवरी मिळे हिटलरला’बाबत तसं न होता ही मालिका लवकर संपली.”

“आता कुठे दुर्गा, विश्वरुप, किशोर सापडले होते. हळूहळू सगळ्यांमधील केमिस्ट्री, कोणाचं कोणाशी काय समीकरण आहे, याची स्पष्टता आल्यानंतर मालिका संपली. त्यामुळे दु:ख या गोष्टीचं आहे, हे पात्र आता पुन्हा जगता येणार नाही. मी ज्या मालिकांमध्ये या आधी काम केलं आहे, त्या माझ्या सगळ्या मालिका चार-पाच वर्षे चालल्या आहेत. त्या मालिकांत मी साकारलेल्या पात्रांबद्दल मी आनंदी आहे. त्या भूमिका मी जगले, त्या भूमिकांना न्याय मिळाला, असं मला वाटतं. इथे तसं नाही, मला आता दुर्गा पुन्हा साकारता येणार नाही.”

“खूप कष्टाने डिरेक्शन डिपार्टमेंट, लेखक, चॅनेल, आम्ही सगळे ते पात्र उभं करतो. ते अर्धवट राहिल्याची भावना आहे. दुर्गा म्हणून मी पुढे काय करेन, त्या भूमिकेबद्दल अमुक अमुक गोष्टी ठरवल्या होत्या. सीन्स माहीत नसले तरी आपण स्वत: काही गोष्टी ठरवलेल्या असतात, आता ते करता येणार नाही. पुढे जी भूमिका मिळेल, ती मी वेगळ्या पद्धतीने साकारेन, दुर्गासारखं करणार नाही, त्यामुळे ते अपूर्ण राहिल्याचं दु:ख आहे.”

मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की…

पुढे शर्मिला शिंदे म्हणाली, “मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की, तुम्हाला मालिका संपत असल्याचं दु:ख होत असणार आहे; तुम्हीसुद्धा मालिकेबरोबर भावनिकरित्या जोडले गेले आहात. पण, चॅनेल आहे. ते काही चुकीचे निर्णय घेणार नाहीत. मालिका बंद होत आहे, म्हणून जरी मी आनंदी नसेन तरी त्यांना चॅनेल चालवायचं आहे. त्यांनी वेळ बदलली म्हणून टीआरपी कमी आला, हे चुकीचं आहे. आपण चॅनेलवर हे आरोप करू शकत नाही.

कुठलाही चॅनेल स्वत:चा शो खराब करणार नाही. ही गोष्ट होत असती तर इतकी वर्षे हे चॅनेल चालले नसते. झी हे मोठं चॅनेल आहे. त्यांना कुठेतरी दिसलं की टीआरपी नाहीये, त्यामुळे ही मालिका बंद होत आहे. का टीआरपी नाही, काय घडलं त्याची कारणं आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाहीत. पण, त्यांनी घेतलेला निर्णय चॅनेलच्या भविष्यासाठी योग्य असणार म्हणून त्यांनी तो घेतला आहे. हे आपण स्वीकारलं पाहिजे.

आपण चॅनेलला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. यापुढे तुम्ही अजून काहीतरी चांगलं आणा आणि या मालिकेतील कलाकारांना त्यामध्ये काम करण्याची संधी द्या, कारण प्रेक्षक अपेक्षा करत आहेत की हेच कलाकार पुन्हा काहीतरी वेगळं घेऊन येतील, त्यामुळे या कलाकारांना पुन्हा संधी द्या आणि आम्हा कलाकारांना पु्न्हा एकत्र आणा. प्रेक्षकांना वाटत होतं की त्य़ांना अजून बघायचं होतं, तर ते आम्हाला वेगळ्या पद्धतीने बघतील”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.