Navri Mile Hitlerla Fame Actress Dance Video : झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका. या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज आणि राकेश बापट यांच्या मुख्य भूमिका होत्या. काही दिवसांपुर्वीच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र तरीसुद्धा ही मालिका प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत.
या मालिकेत लीला आणि एजे यांच्यातील खास नात्याला प्रेक्षकांनी पसंती दिलीच; मात्र लीला आणि तिची बहीण रेवती या दोघींचे नातेही प्रेक्षकांना तितकंच भावलं. याचं कारण म्हणजे त्यांचे नाते हे पडद्यावरील मालिकेत जितकं सुंदर होतं, तितकंच ते नातं ऑफस्क्रीनसुद्धा सुंदरच आहे.
मालिकेत लीलाची भूमिका साकारणारी वल्लरी आणि रेवतीची भूमिका साकारणारी आलापिनी या दोघीही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर दोघी त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. दोघींच्या डान्सला चाहत्यांकडूनही विशेष पसंती मिळत असते.
वल्लरी आणि आलापिनी सोशल मीडियावर त्यांचे अनेक डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात आणि त्यांचा प्रत्येक डान्स व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेताना दिसतो. अशातच दोघींनी नुकताच एक नवीन नृत्याविष्कार सादर केला आहे. ‘चिंब भिजलेले’ या लोकप्रिय मराठी गाण्यावरील हा नृत्याविष्कार आहे.
वल्लरी विराज आणि आलापिनी यांचा डान्स व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये दोघींपैकी एकीला (वल्लरी) पाऊस आवडत नाहीय; तर एकीला (आलापिनी) पाऊस प्रचंड आवडत आहे. या संकल्पनेवरच दोघींनी सादरीकरण केलं आहे. बिल्डिंगच्या बाल्कनीमध्ये त्यांनी या गाण्याचं खास सादरीकरण केलं आहे. त्यात दोघींच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी कौतुकास्पदच आहेत.
वल्लरी आणि आलापिनी यांच्या या व्हिडीओला अवघ्या काही क्षणांत एक लाख तीन हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर दोनशेहून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांनाच नव्हे तर अनेक कलाकारांनासुद्धा या व्हिडीओवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री ऋजुता देशमुख, भुमिजा पाटील, विजया बाबर, ऋतुजा जुन्नरकर, सीमा घोगळे यांसह अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर त्यांना दोघींचं डान्स आवडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर मालिकेच्या अनेक फॅन पेजेसनीसुद्धा या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, आलापिनी आणि वल्लरी यांच्यातील खास नातं कायमच प्रेक्षकांना भावलं आहे. नुकतंच वल्लरीने तिच्या सोशल मीडियावर ‘आस्क मी सेशन’ केलं. यात वल्लरीला एका चाहत्याकडून आलापिनीबरोबरच्या खास नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने दोघींचा मालिकेच्या सेटवरील एज मजेशीर व्हिडीओ शेअर केला.