Navri Mile Hitlerla Upcoming Twist: चित्रपट, मालिका, वेब सीरीज पाहत असताना प्रेक्षकांना अनेकदा वाटत असते की खलनायकाचा चेहरा नायकासमोर यावा, त्याचे सत्य सर्वांना समजावे. असे जेव्हा घडते, तेव्हा अशा सीनला प्रेक्षक दाद देताना दिसतात.
आता ‘नवरी मिळे हिटलरला‘ या मालिकेतदेखील खलनायकाचा चेहरा समोर येणार आहे. मालिकेत किशोर खलनायक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला एजेला उद्ध्वस्त करायचे आहे. त्यासाठी तो अनेक प्रयत्न करताना दिसतो. त्याने एजे व लीला यांच्यात फूट पडावी. एजेचा संसार उद्ध्वस्त व्हावा आणि एजेला दु:खाचा सामना करावा लागावा, यासाठी अनेक कट कारस्थान करताना दिसला आहे.
एजे व लीलामध्ये फूट पडावी, यासाठी त्याने दुर्गाच्या मनात जो संताप होता, त्याचा फायदा करून घेतला. दुर्गाच्या मदतीने त्याने लीलाला त्रास दिला. जेव्हा एजेने त्याच्यावर ऑफिसची जबाबदारी दिली, तेव्हा त्याने या संधीचे सोने करून घ्यायचे ठरवले. व्यवसायात एजेला मोठे नुकसान व्हावे, यासाठी त्याने प्रयत्न केले. तसेच, एजे व लीला यांचा संसार मोडावा यासाठी त्याने एजेची पहिली पत्नी अंतरा घरी येईल, अशी परिस्थिती निर्माण केली. आता जहागिरदारांना त्रास देणारा दुसरा-तिसरा कोणी नसून किशोर आहे, हे लीला व अंतराच्या समोर येणार आहे.
लीला व अंतराला किशोर किडनॅप करणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की लीला व अंतरा घराबाहेर आहेत. तितक्यात एक गाडी येते. त्या दोघींना त्या गाडीत काही गुंड जबरदस्तीने बसवतात. त्यानंतर त्यांना एका खोलीत खुर्चीला बांधून ठेवले जाते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की अंतरा व लीला घाबरलेल्या दिसत आहेत. तितक्यात त्यांना एक आवाज येतो. तो माणूस वेलकम म्हणत असल्याचे ऐकायला येते. मात्र, त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. ते पाहून लीला संतापाने म्हणते, कोण आहेस तू? अंधारात काय लपतोयस? हिंमत असेल तर समोर ये.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, किशोर अंधारातून पुढे येतो. तो म्हणतो, “काय म्हणताय लीला आई? अंतरा आई?” किशोरला पाहून दोघींनादेखील धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने “अंतरा आणि लीलासमोर येणार किशोरचा खरा चेहरा”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, लीला प्रेग्नंट आहे. मात्र, तिने अद्याप याबद्दल कोणालाही सांगितले नाही. आता त्याबद्दल अंतराला माहित झाले आहे. अंतराची स्मृतीदेखील परत आली आहे. तसेच, नुकतेच पाहायला मिळाले की एजेच्या हॉटलेमध्ये एक पार्टी झाली होती. त्यातून लोकांना अन्नातून विषबाधा झाली. त्यामुळे पोलिस एजेला अटक करण्यासाठी घरी आले होते. याला जबाबदारदेखील किशोर असल्याचे पाहायला मिळते.
आता एजे, दुर्गा व आजीसमोर किशोरचा खरा चेहरा कधी येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.