‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धीझोतात आलेली निक्की तांबोळी ‘बिग बॉस’च्या घरातील तिच्या खेळामुळे विशेषत: तिच्या विधानांमुळे चर्चेत राहिली. निक्कीने ‘बिग बॉस’ हिंदीनंतर ‘बिग बॉस’ मराठीतही सहभाग घेतला होता, तर यानंतर आता पहिल्यांदाच निक्की एका मराठी कार्यक्रमामध्ये झळकत आहे.
‘स्टार प्रवाह’वर नुकतच २६ एप्रिल रोजी ‘शिट्टी वाजली रे’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. यामध्ये मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पाहायला मिळत आहेत. यामध्ये निक्की तांबोळीदेखील सहभागी झाली आहे. हा कार्यक्रम शनिवार-रविवार रात्री ९ वाजता प्रसारित होतो; तर या कार्यक्रमाबद्दलची खास गोष्ट म्हणजे यामध्ये सर्व कलाकार मंडळी वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसतात.
वेगवेगळे पदार्थ बनवण्याबरोबरच कलाकारांना इतर मजेशीर टास्कही दिले जातात. अशातच आता नुकताच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये निक्की उखाणा घेताना दिसत आहे, तर यामध्ये निक्कीसह विनायक माळीदेखील पाहायला मिळत आहे. निक्कीने विनायकसाठी आगरी भाषेत उखाणा घेतला आहे. यावेळी निक्कीने “चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं, घास भरवते मेल्या तोंड कर इकडं” असा उखाणा घेतला आहे; तर या व्हिडीओखाली ‘दादूस.., पूर्ण शो गाजवणार आगरी कोळी ऑन फायर’, ‘उखाणा एकदम भारी’ अशा कमेंट्स केलेल्या पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात अभिनेता अमेय वाघ सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे. तर या शोमध्ये मधुराणी गोखले, रुपाली भोसले, आशिष पाटील, माधुरी पवार गौतमी पाटील, विनायक माळी, धनंजय पोवार आणि इतर कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. हा एक कुकिंग शो असून यामध्ये कलाकार मंडळी जेवण बनवण्याबरोबरच प्रेक्षकांचं मनोरंजनही करताना दिसतात. विशेष म्हणजे कलाकारांनी बनवलेल्या पदार्थांचं परिक्षणही केलं जातं. हे परीक्षण सेलिब्रिटी शेफ जयंती कठाळे दिसत आहेत.