Nilesh Sabale And Sharad Upadhye Controversy : ‘हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे’ असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राला ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून हसायला भाग पाडणारा डॉ. निलेश साबळे गेल्या दोन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. या चर्चेचं कारण म्हणजे राशीचक्रकार शरद उपाध्येंनी त्याच्यावर केलेले गंभीर आरोप. शरद उपाध्ये हे काही वर्षांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये आले होते. तेव्हा त्यांना वाईट अनुभव आलेला. हाच अनुभव त्यांनी फेसबुक पोस्टवर विस्ताराने लिहिलं.
शरद उपाध्येंनी निलेश आपल्या डोक्यात हवा गेली, त्यामुळे वाहिनीने डच्चू दिला असे अनेक आरोप त्याच्यावर केले आणि दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. ज्यावर निलेशनेही व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं. तसंच शरद उपाध्येंच्या सगळ्या आरोपांचे खंडनही केलं. शरद उपाध्येंच्या फेसबुक पोस्टनंतर मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी निलेश साबळेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहेत. अशातच शोमधील अभिषेक बारहाते-पाटील या अभिनेत्याने निलेश साबळेबद्दलची सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
अभिषेकने ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये काही स्किट्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या शोमधील त्याचं किम जोंग-उन ही भूमिका विशेष गाजली होती. अभिषेक पोस्टमध्ये असं म्हणतो, “सन्मा. शरद उपाध्ये साहेब. तुमची डॉ. निलेश साबळे यांच्याबद्दलची एक पोस्ट वाचली. ते डॉक्टर ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या गावातल्या मुलांची स्वप्नं साकार झाली. त्या माणसाबद्दल वाईट, अपमानास्पद बोललं गेलं.”
या पोस्टमध्ये पुढे त्याने असं म्हटलं, “डोक्यात हवा गेलीय, याला आपणच मोठं केलं आणि सगळा अभिनय फक्त स्वतःचा शोभा वाढवायला असं किती काही वाचायला मिळालं. खरं सांगायचं, तर राग आला. पण त्याहून जास्त खंत वाटली; कारण तुम्ही टीका त्या माणसावर केली, ज्यांनी लोकांमध्ये चेहरा नसलेल्या, आवाज नसलेल्या, नाव नसलेल्या मुलांना नाव दिलं, आवाज दिला आणि स्टेजही दिला.”
यापुढे अभिषेक म्हणतो, “हो, मी गावाकडचा आहे. शुद्ध भाषेचा अभाव बोलण्याची भीती होती. अभिनय माहीत नसलेला; पण तेव्हा कोणीतरी होता ज्याने आमच्यासारख्या गावठीवर विश्वास ठेवला. आम्ही काहीतरी करू शकतो हे पहिल्यांदा दाखवून दिलं. डॉ. निलेश साबळे आमचे मार्गदर्शक, आमची ओळख आहेत. ज्या शोबद्दल आपण बोललात, तो शो शून्य जाहिरातीतून, शून्य गॉसिपमध्ये राहून फक्त कामावर विश्वास ठेवत अविरतपणे चालवला तो साबळेसरांनी आणि बघता बघता तो कार्यक्रम दहा वर्ष टिकला.”
यानंतर त्याने म्हटलं, “लोक मराठी शो बदलून पाहायचे. हिंदी कलाकार मराठीत यायला भाग पडले ते यामुळेच. पहिला मराठी शो, ज्याने हिंदी कलाकार मराठी स्टेजवर आणले आणि एक दिवस असा आला की, ‘चला हवा येऊ द्या शो’ फक्त मुंबईपुरती मर्यादित गोष्ट राहिली नाही. कोणी तरी म्हणालं “स्टारडम डोक्यात गेलं आहे.” हो, गेलंय कदाचित; पण ते डोक्यात गेलेलं ‘हवा’ नाही तर अनुभव, संघर्ष आणि हजारोंच्या पाठीशी उभं राहिलेलं आत्मभान आहे.”
यानंतर अभिषेकने म्हटलं, “आमच्यासारख्या पोरांना लोक विचारायचे, “तू कुठून आलास?” आज विचारतात, “तू त्या शोमध्ये होता ना?” ही ओळख फुकट मिळत नाही. ही ओळख मिळवून द्यायला कोणीतरी आयुष्य घालवतं आणि म्हणूनच, कोणीही काहीही बोलेल, तरी सत्य बदलत नाही. ज्यांनी निर्माण केलं, त्यांचं योगदान काही पोस्टने मिटत नाही. हे सरांचं कौतुक नाही, हे आम्हा सर्वांचं उत्तर आहे. कारण जिथे आमचा आवाज थांबतो, तिथे त्यांनी आम्हाला बोलायला शिकवलं.”
पुढे अभिषेक असं म्हणतो, “आज कोणी त्यांच्यावर बोट दाखवत असेल, तर आम्ही शंभर आवाज त्यांचं नाव पुन्हा पुन्हा उच्चारू. आमचं शिक्षण, आमचा आत्मविश्वास, आमची ओळख किती मोलाची असते हे तुम्हाला समजणार नाही. कारण तुमचं सगळं काही तयार होतं. आमचं तर त्यांच्यामुळे सुरू झालं. तुम्ही टीका करत राहा, आम्ही आदर करत राहू. कारण तुम्ही नाव घेतलं आणि आम्ही त्यांच्या बरोबर उभं राहून नाव कमावलं.”
दरम्यान, निलेश साबळेने व्हिडीओमध्ये, “शरद उपाध्ये सर, कोणत्याही माहित नसलेल्या गोष्टींवर जबाबदारीने बोलणं महत्त्वाच आहे. तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने पोस्ट लिहिताना थोडी माहिती घ्यायला हवी होती” असं म्हटलं. तसंच या व्हिडीओद्वारे त्याने सिनेमाचं शूटिंग आणि अन्य कामं असल्याने चला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या सीझनमधून माघार घेतल्याचंही सांगितलं.