Nilesh Sable on support of his wife: निलेश साबळे हा काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. ‘चला हवा येऊ द्या‘मधून नीलेशला मोठी लोकप्रियता मिळाली. या शोचा सूत्रसंचालक म्हणून त्याने काम केले होते.

झी मराठी वाहिनीने जेव्हा ‘चला हवा येऊ द्या‘च्या सीझन २ची घोषणा केली. त्यावेळी त्या पर्वात निलेश साबळे या शोचा भाग नसल्याचे समोर आले. त्यानंतर मोठ्या चर्चा झाल्या. ‘राशिचक्र‘कार शरद उपाध्ये यांनी नीलेश साबळेबाबत एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर निलेशने एक व्हिडीओ शेअर करीत त्यांना उत्तर दिले होते.

“मला माझ्या पत्नीचा पहिल्यापासूनच पाठिंबा आहे”

आता ‘लोकशाही फ्रेंडली‘ला दिलेल्या मुलाखतीत निलेशने पत्नी गौरीबाबत वक्तव्य केले आहे. निलेश म्हणाला, “मला माझ्या पत्नीचा पहिल्यापासूनच पाठिंबा आहे. अनेकांना माहीत आहे की, आम्ही कॉलेजपासूनचे मित्र होतो. ती सांगलीला बीएएमएसला होती. मी गडहिंग्लजला होतो. केदारी रेडेकर कॉलेजला होतो. आमची ओळख सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान झाली. ती गायनासाठी यायची आणि मी अभिनय, नकला, एकपात्री अभिनय यासाठी माझ्या कॉलेजकडून जायचो.

“तिथे आमची ओळख झाली. मग मैत्री झाली आणि ती मैत्री वाढत गेली. त्यानंतर मी तिला विचारलं होतं. तेव्हापासून तिला माहीत होतं की, मला काय करायचं आहे आणि मी तिला तेव्हाही म्हणालो होतो की, कदाचित मी वैद्यकीय व्यवसाय करणार नाही, तर ते तुला आवडेल का? तर ती तेव्हाच म्हणाली होती की, तू जे करशील, त्यामध्ये मी तुझ्या पाठीशी असेन. त्याप्रमाणे तेव्हापासून ते आजपर्यंत ती माझ्या पाठीशी आहे. आज आम्हाला साडेचार वर्षांची मुलगी आहे. तिच्यामुळे माझा इथपर्यंतचा प्रवास सोपा झाला आहे.

पुढे निलेश म्हणाला, “मी थोडासा आळशी आहे. मी थोडासा बेशिस्त आहे. चांगल्या अर्थानं बेशिस्त आहे, खूप बेशिस्त नाही. पण, आयुष्याला जशी शिस्त पाहिजे असते, तशी कमी आहे. ती आहे, त्यामुळे माझ्या आयुष्याला थोडीशी शिस्त राहते. मी जरी शूटिंगला गेलो तरी माझ्या घरून माझा डबा येतोच. मग ते शूटिंग कुठेही असू दे. त्या सगळ्यामुळे माझ्या आयुष्याला एक शिस्त आहे. नाही तर मग ते खूप विस्कळित झालं असतं.”

“विश्वास खूप महत्त्वाचा असतो. मी करतोय, त्या कामावर तिचा विश्वास आहे. मला नेहमी असं वाटतं की, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करीत असाल, त्या कामासाठी जर तुमचा जोडीदार तुम्हाला पाठिंबा देणारा नसेल, तर त्या कामात तुमचं लक्ष लागत नाही.”

करोनामध्ये जेव्हा ‘झी युवा’वर ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा कार्यक्रम करायचं ठरवलं. त्यावेळी त्याचं शूटिंग घरातून करायचं होतं. त्यामुळे शूटिंग करताना गौरीनं मदत केली होती. तिला कलेत इंटरेस्ट आहे. त्यामुळे त्या त्या वेळी गोष्टी करणं, हे सोपं झालं. नाही तर अवघड झालं असतं, असेही निलेश म्हणाला.

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’चा दुसरा सीझन २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर निलेश साबळे एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.