Padmini Kolhapure : ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ नावाची एक नवी मालिका येत आहे. या आगामी ऐतिहासिक मालिकेतून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन पराक्रम, नेतृत्व आणि शूर वारशाची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या भव्य मालिकेत पृथ्वीराज चौहान राजाची एका युवा, भाबड्या राजकुमारापासून ते भारतातील एक महान योद्धा राजा झाले, त्या प्रवासाची कहाणी उलगडणार आहे. या मालिकेत त्याची युवावस्था, त्याचा संघर्ष, त्याने मिळवलेले विजय आणि त्यातून आकाराला आलेला एक महान शासनकर्ता असा एक दिव्य प्रवास प्रेक्षकांना पाहता येईल.

या मालिकेच्या राजेशाही थाटाला साजेशा राजमातेच्या शालीन भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे दिसणार आहेत. परंपरा आणि नवतेशी जुळवून घेण्याची वृत्ती यांचा समतोल सांभाळत, आपल्या अढळ प्रेमाने आणि सूक्ष्मदृष्टीने त्या भावी राजाला मार्गदर्शन देते. आपल्या शांत दृढतेने आणि सखोल प्रभावाने साम्राज्य जोडून ठेवणाऱ्या राजमातेच्या भूमिकेतून पद्मिनी टीव्हीवर पुनरागमन करत आहेत.

टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्याबाबत आणि आपल्या भूमिकेविषयी बोलताना पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या, “‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत काम करणं ही माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे. फक्त मी एक दमदार भूमिका करत असल्यामुळेच नाही, तर जवळजवळ ११ वर्षांनंतर मी टेलिव्हिजनवर परतत आहे म्हणून. टेलिव्हिजनवरील माझ्या प्रवासाची सुरुवात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनपासूनच झाली होती. आणि आता इतक्या वर्षांनी, या आव्हानात्मक आणि समाधान देणाऱ्या भूमिकेद्वारे मी पुन्हा त्याच वाहिनीवर परतत आहे.”

padmini kolhapure tv comeback
पद्मिनी कोल्हापुरे यांचा मालिकेतील लूक

अशा भूमिका क्वचितच मिळतात – पद्मिनी कोल्हापुरे

पुढे त्या म्हणाल्या, “ही भूमिका जेव्हा मला देण्यात आली, तेव्हा राजमातेची व्यक्तिरेखा मला आपलीशी वाटली. इतकी सखोलता, ग्रेस आणि शांततेची ताकद दाखवणारी भूमिका क्वचितच करायला मिळते. ती केवळ एक राणी किंवा माता नाही- ती या राज्याचा आत्मा आहे. राजमाताची भूमिका करताना पडद्याच्या मागे राहून शांतपणे इतिहासाला आकार देणाऱ्या त्या सर्व खंबीर महिलांना सन्मान देत असल्याची भावना मनात येते. तिचे पृथ्वीराजशी सुंदर नाते आहे. ती त्याची मार्गदर्शक, आधार आहे आणि तिचा त्याच्यावर मोठा प्रभाव आहे. अशी दमदार आणि बारकाईने रेखाटलेली व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणे ही गौरवाची गोष्ट आहे. मला आशा आहे की माझ्या प्रमाणेच प्रेक्षकांना देखील तिचा प्रवास आपलासा वाटेल.”

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिका १९ मे पासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेसात वाजता तुम्हाला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन व सोनी लिव्हवर पाहता येईल.