लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री नारायणी शास्त्री मागील २७ वर्षांपासून अभिनयविश्वात सक्रिय आहे. ४७ वर्षांच्या नारायणीने तिच्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘पक पक पकाक’ या मराठी सिनेमात साळू ही भूमिका केली होती. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेत केसर ही भूमिका साकारून तिला लोकप्रियता मिळाली. पुढे नारायणीने ‘पिया का घर’, ‘कोई अपना सा’, ‘आप की नजरों ने समझा’, ‘पिया रंगरेझ’ या मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
नारायणी तिच्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिली. नारायणी अभिनेता अनुज सक्सेनासोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण त्यांचे ब्रेकअप झाले. नंतर ती अभिनेता गौरव चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी नच बलिये २ मध्ये भागही घेतला होता. पण त्यांचं ब्रेकअप झालं. मग २०१५ मध्ये नारायणीने स्टीव्हन ग्रेव्हरशी लग्न केलं.
नारायणी शास्त्रीला एक भाऊ असून त्या पाच बहिणी आहे. एका मुलाखतीत नारायणीने तिच्या कुटुंबाबद्दल सांगितलं होतं. नारायणीचा जन्म पुण्यातला आहे. तिचे वडील उत्तर प्रदेशचे असून तिची आई रुक्मिणी शास्त्री मराठी आहे. नारायणीचे वडील रमेश शास्त्री हे मूळचे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजचे होते, अशी माहिती तिने दिली होती.
घरात सर्वजण हिंदी बोलायचे – नारायणी
“माझे वडील अलाहाबादचे (आताचे प्रयागराज) होते आणि लहानपणी मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिथे जायचे. माझी आई महाराष्ट्रीय आहे, पण तिने शुद्ध हिंदी खूप लवकर शिकली, त्यामुळे घरी आम्ही हिंदी बोलायचो. खरं तर, मला मराठी नीट येत नाही पण खूप छान हिंदी येते. त्यामुळे मला माझ्या कामात खूप मदत झाली आहे. बऱ्याच लोकांना माझी भाषा ऐकल्यावर मी मुंबईची नाही, यावर विश्वास बसत नाही,” असं नारायणीने एका मुलाखतीत म्हणाली होती.
“आम्ही भावंड लहानपणी खूप शांत होतो, कधीच गोंधळ घालायचो नाही, आईला त्रास द्यायचो नाही,” असं भावंडांबाबत नारायणीने सांगितलं.
दरम्यान, नारायणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या तिच्या कुटुंबातील सदस्यांबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. तसेच ती मालिकेच्या सेटवरील फोटो व व्हिडीओ, रील्स सोशल मीडियावर शेअर करत असते.