Paru Fame Actress Talks About Her Off Screen Bond With Ahilyadevi : ‘पारू’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. त्यामध्ये अनेक मराठी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांतून पाहायला मिळतात. त्यात अहिल्यादेवी व दिशा या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्यातील ऑफस्क्रीन बाँडबद्दलची माहिती दिली आहे.

‘पारू’ मालिकेत अहिल्यादेवींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मुग्धा कर्णिक व दिशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा शिंदेने नुकतीच ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी मालिकेच्या सेटवरील किस्से व त्यांच्यातील ऑफस्क्रीन बाँडबद्दल सांगितलं आहे. मालिकेत एकमेकींच्या विरोधात असणाऱ्या या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असल्याचं यातून समजतं.

‘अशी’ होती पूर्वा शिंदे व मुग्धा कर्णिक यांची पहिली भेट

मुलाखतीमध्ये दोघींना एकमेकींच्या पहिल्या भेटीबद्दल विचारण्यात आलेलं. त्याबद्दल पूर्वा मुग्धा यांच्याबद्दल बोलताना म्हणाली, “पहिल्या भेटीतच ताई मला खूप छान वाटली होती. तिला गोष्टींबद्दल खूप स्पष्टता असते. गेलं एक-दीड वर्ष एकमेकांबरोबर काम करत असल्यानं आता आमचा बाँड खूप चांगला झाला आहे. त्यामुळे ताई कधी काम करत असेल, कोणाशी बोलत असेल तरी मी ते बघत नाही आणि सरळ माझ्या मनात जे असेल, मला जे तिला सांगायचं असेल ते तिला सांगते इतकं आमचं नातं चांगलं झालं आहे.”

पूर्वा शिंदेने केलं मुग्धा कर्णिक यांचं कौतुक

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी तर बऱ्याचदा तिचा ओरडा खाते. कारण- मी नेहमी मूर्खपणा करत असते. त्यामुळे मला तिच्या ओरडण्याचं वाईट वाटत नाही. मला कधी काही सल्ला हवा असेल, तर मी तिच्याकडे जाते. मध्यंतरी जेव्हा मालिकेत मी तुरुंगात आहे, असं दाखवण्यात आलेलं तेव्हा माझं शूटिंग नसायचं. मी घरीच असायचे त्यावेळी अनेकदा मी इन्स्टाग्राम अकाउंट बंद केलेलं. फार कमी लोकांनी ते पाहिलं. त्यातली एक मुग्धाताई होती. तिने मला फोन केलेला की, तू ठीक आहेस ना वगैरे विचारायला”.

मुग्धा यांच्याबद्दल बोलताना पूर्वा पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की, आम्ही २४ तास जरी एकत्र फिरत नसलो तरी मला जेव्हा केव्हा तिची गरज वाटते. मला पाठिंब्याची गरज असते तेव्हा ती नेहमी माझ्यासाठी तिथे असते. त्याबद्दल मी तिचं खूप कौतुक करते.” पुढे मुग्धा यांनीसद्धा पूर्वाबद्दल सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वाबद्दल त्या म्हणाल्या, “पहिल्यांदा जेव्हा मी तिला भेटले होते तेव्हा मला ती वादळ असतं ना तशी वाटली होती. आजही ती सेटवर आली की, आम्ही सगळे म्हणतो वादळ आलं वादळ. ज्या वेगानं ती गाडी चालवते, ते पाहून ती आता कोणाला तरी ठोकेल, असं वाटतं. तसंच काहीसं माझं तिच्याबद्दल मत झालं होतं. नंतर असं लक्षात आलं की, ती खूप बडबड करणारी मुलगी आहे; पण तिच्या मनात काही नसतं. तिला जे वाटतं, ते ती सांगते.”

पूर्वाच कौतुक करीत मुग्धा पुढे म्हणाल्या, “ती मनानं खूप चांगली आहे. तिला असं वाटतं की, आपण जसे आहोत, तसंच जग असतं; पण ते तसं नाहीये हे मी तिला अनेकदा सांगत असते. पण, ठीक आहे तिचं तिलाच हे कधीतरी जाणवेल.”