Paru Serial New Promo : ‘पारू’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे व प्रसाद जवादे यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेत अनेक ट्विस्ट येत असतात. अशातच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.
‘पारू’ मालिकेत सध्या आदित्य व साजिरी यांचा साखरपुडा सुरू असल्याचं पाहायला मिळालं. आदित्य त्याच्या मनाविरुद्ध जाऊन साजिरीबरोबर साखरपुडा करायला तयार होतो. तर दुसरीकडे दिशानं मारुती व सयामामा यांना मारायला गुंड पाठवलेले असतात. जेणेकरून आदित्यचा साजिरीबरोबर साखरपुडा होईल आणि तो पारूपासून दुरावला जाईल.
साखरपुडा सुरू असताना आदित्य इच्छा नसतानाही साजिरीच्या बोटात अंगठी घालत असतो; पण तो साजिरीच्या बोटात अंगठी घालणार तितक्यात तिथे सयामामा येतात आणि आदित्य व साजिरीचा साखरपुडा थांबवतात. त्यावेळी अहिल्यादेवींना ते “मी म्हटलं होतं ना की, हा साखरपुडा मी होऊ देणार नाही”, असं म्हणतात. त्यावर त्या “तुला का माझ्या मुलाचं सुख बघवत नाहीये”, असं म्हणतात. सयामामा त्यावर “त्याचं सुख कशात आहे हे मला माहीत आहे आणि आदित्य अहिल्याला सगळं खरं सांग आणि तुझ्या प्रेमाची साथ दे”, असं म्हणतात.
आदित्य त्यानंतर अहिल्यादेवींना सगळं खरं खरं सांगतो. पारू व त्याचं लग्न झालं असून, ती आता पार्वती आदित्य किर्लोस्कर आहे, असं म्हणतो. आदित्यनं सगळ्यांसमोर पारूवरच्या प्रेमाची कबुली दिली असून, त्यांच्या नात्याचं सत्य सांगितल्यानंतर आता मालिकेत पुढे काय होणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अशातच आता ‘झी मराठी’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे.
‘पारू’ मालिकेत मोठं वळंण
समोर आलेल्या प्रोमोमध्ये वाहिनीने ‘पारू सुरू करणार आदित्यसोबत तिचा नवा संसार’ अशी कॅप्शन दिली आहे. त्यामध्ये आदित्य व पारू किर्लोस्कर बंगल्याच्या बाहेर गेटजवळ उभे असल्याचं पाहायला मिळतं. त्यावेळी आदित्य पारूला “चल पारू आजपासून आपल्याला आपला संसार सुरू करायचा आहे”, असं म्हणतो. त्यावर पारू, “आदित्यसर देवी आईंना अभिमान वाटेल, असंच काम करूया”, असं म्हणताना दिसते. त्यानंतर पुढे आदित्य पारूचा हात धरून किर्लोस्कर बंगल्यातून निघून जातो.
आदित्य व पारू किर्लोस्कर बंगल्याबाहेर का उभे असतात, तिथून ते का निघून जातात, अहिल्यादेवींनी त्यांना घराबाहेर जायला सांगितलं आहे का?, नेमकं काय घडलं आहे हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल. पण, आदित्य व पारू घराबाहेर जरी गेले असले तरी ते नव्याने त्यांच्या संसाराची सुरुवात कशी करणार हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे.