Priya Marathe Passes Away: टीव्हीवरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मालिकेची कथा ज्या पद्धतीने मांडली जाते, मालिकेत येणारे ट्विस्ट, त्यातील पात्रे, ती पात्रे साकारणारे कलाकार, त्यांचा सहज अभिनय आणि इतर अनेक गोष्टींमुळे अशा मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात.
अशा मालिकांपैकीच पवित्र रिश्ता ही एक मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे व दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत दिसले होते. याच मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठेने वर्षा ही भूमिका साकारली होती. तिची भूमिका चांगलीच गाजली होती. अभिनेत्रीचे ३१ ऑगस्टला २०२५ रोजी कर्करोगाने निधन झाले. तिच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी भावूक पोस्ट शेअर केल्या आहेत.
‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट
पवित्र रिश्ता या मालिकेत वर्षाच्या नवऱ्याची भूमिका साकारलेल्या अभिनेता अनुराग शर्मानेदेखील एक पोस्ट शेअर करीत प्रियाबरोबरच्या आठवणी सांगितल्या आहेत. अभिनेत्याने लिहिले, “प्रियाचे निधन ही धक्कादायक व अविश्वसनीय बातमी आहे. मी एका चांगल्या व्यक्तीला, हुशार कलाकाराला आणि एका मैत्रिणीला गमावले.”
“माझ्या मनात सध्या तुझ्याबरोबरच्या हजारो आठवणी आहेत; पण हात थरथरत आहेत. तुझ्याबरोबर मी जे काम केले, त्यादरम्यानच्या आठवणी नेहमीच माझ्या मनात असतील.”
अनुराग पुढे म्हणाला, “प्रिया मराठेबरोबर स्क्रीन शेअर करणे हा एक सन्मान होता. ती खूप प्रेमळ व्यक्ती होती. तिचे हसू कधीही विसरता येणार नाही. “
माझी मैत्रीण, प्रिया मराठेच्या आत्म्यास शांती लाभो, असे लिहीत त्याने भावूक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करताना त्याने पवित्र रिश्ता या मालिकेतील त्यांच्या सीनचे काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याने पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स करीत दु:ख झाल्याचे लिहिले आहे.ही धक्कादायक बातमी असल्याचे काहींनी म्हटले आहे. तर काहींनी भावपूर्ण श्रद्धांजली, असे लिहिले आहे.
दरम्यान, अभिनेत्याने पवित्र रिश्ता मालिकेत सतीश ही भूमिका साकारली होती. वर्षा व सतीश यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. पवित्र रिश्ता या मालिकेनंतर प्रियाने विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.