Priya Marathe Passed Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे ३१ ऑगस्ट २०२५ ला निधन झाले. अभिनेत्री काही वर्षांपासून कर्करोगाचा सामना करीत होती. अवघ्या ३८ व्या वर्षी प्रियाचे निधन झाले. तिच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

“बरी होऊन तू पुन्हा…”

अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “प्रिया, तसं पाहिलं आपण एकत्र काम केलं नाही. आपण कार्यक्रमांच्या वेळेस भेटलो. तुझ्याबरोबरचा तो वेळ छान गेला होता. खूप छान अभिनेत्री, उत्तम बायको, अशीच तुझी प्रतिमा मी पाहिली.

पुढे त्यांनी लिहिले की, बातमी वाचल्यानंतर धक्का बसला. तुझ्या आजाराबद्दल मी ऐकलं होतं. पण, बरी होऊन तू पुन्हा कामाला लागलीस, असंच वाटलं. हे वय नाही गं जाण्याचं, खूप वाईट वाटत आहे. सेटवर आल्यापासून कोणाशी बोलावंसं वाटत नाही. तू नेहमी आठवणीत राहशील. भावपूर्ण श्रद्धांजली, असे लिहीत अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सुरेखा कुडची यांच्याबरोबरच सुबोध भावे, प्रवीण तरडे यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रिया मराठेने तिच्या कारकि‍र्दीत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या. त्यामध्ये पवित्र रिश्ता, चार दिवस सासूचे, बडे अच्छे लगते हैं या मालिकांचा समावेश आहे.

या सुखांनो या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले. त्यानंतर ‘तू तिथं मी’, ‘चार दिवस सासूचे’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी मी तशी नांदायला’, अशा मालिकांमध्ये तिने काम केले. त्याबरोबरच ती ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतदेखील महत्वपूर्ण साकारली. मराठीसह तिने हिंदी मालिकांमध्येदेखील स्वत:ची ओळख निर्माण केली. तिची पवित्र रिश्ता या मालिकेतील वर्षा या भूमिकेला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिलाले. ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कसम’, ‘साथ निभाना साथियाँ’, या मालिकेत तिने साकारलेल्या भूमिका मोठ्या प्रमाणात गाजल्या.

प्रियाच्या अकाली निधनाने कलाकारांसह चाहत्यांनादेखील धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरील कलाकारांच्या पोस्टवर कमेंट्स करीत तिच्या निधनाच्या बातमी अविश्वसनीय असल्याचे म्हटले आहे.