Pinga Ga Pori Pinga Serial Fame Actress Leg Fracture : मनोरंजन सृष्टीत काम करणारी कलाकार मंडळी आपल्या फिटनेसबद्दल कायमच जागरूक असतात. योग्य डाएट आणि योग्य व्यायाम करत ते आपल्या आरोग्याची काळजी घेतात. मात्र कधीकधी त्यांना काही अपघात किंवा कामाच्या धावपळीत दुखापत होत असते. पण तरीही ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत ते नव्या जोमाने कामाला लागतात.
अशीच लोकप्रिय मराठी अभिनेत्री पायाला दुखापत असूनही शूटिंग करत असल्याचं पाहायला मिळालं, ही अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या शेटे. ऐश्वर्या सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती वल्लरी ही भूमिका करत आहे. मालिकेततील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. नुकतंच तिच्या पायाला दुखापत झाल्याचं समोर येत आहे.
ऐश्वर्याची मैत्रीण आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेतील तिची सहअभिनेत्री विदिशा म्हसकरने ऐश्वर्याच्या पायाला दुखापत झाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. विदिशा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो-व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच मालिकेतील शूटिंगदरम्यानच्या काही रंजक गोष्टीसुद्धा शेअर करत असते.
अशातच विदिशाने ऐश्वर्याच्या पायाला दुखापत झाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या पाय फ्रॅक्चर असल्याने तिला दोघेजण चालण्यासाठी मदत करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणते, “याला म्हणतात मेहनत. पायाला प्लास्टर असूनही मॅडम (ऐश्वर्या शेटे) शुटींग करत आहेत. ते पण आउट डोअर.” या व्हिडीओबरोबरच ऐश्वर्यानेसुद्धा विदिशाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात विदिशा ऐश्वर्याला पायाच्या दुखापतीवरून चिडवत आहे. विदिशा तिला नाचवून दाखवत आहे.



दरम्यान, विदिशा आणि ऐश्वर्या मालिकेत एकमेकींच्या खूप खास मैत्रिणी आहेत. मालिकेत ऑनस्क्रीन असलेला त्यांचा हा बॉण्ड खऱ्या आयुष्यातही आहे. दोघी एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. मालिकेत ऐश्वर्या आणि विदिशा यांच्यासह शाश्वती पिंपळीकर (प्रेरणा), प्राजक्ता परब (मिथिला), आकांक्षा गाडे (श्वेता) या अभिनेत्रीसुद्धा मुख्य भूमिकांमध्ये आहेत. या पाच मैत्रिणींच्या मैत्रीची गोष्ट ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळते.