Tejashree Walavalkar met Ashok Saraf: अशोक सराफ यांनी आजवर मराठी तसेच हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. त्यांच्या मराठी चित्रपटांतील भूमिका विशेष गाजल्या. अशोक सराफ यांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक वाट पाहत असत. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.
आज अशोक सराफ यांना गुरूस्थानी मानणारे, अभिनयासाठी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारे अनेक कलाकार आहेत. काही कलाकार वेळोवेळी त्यांच्याप्रति भावना व्यक्त करतात. काही दिवसांपूर्वीच अशोक सराफ यांना अभिनय क्षेत्रातील त्यांच्या कामासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविले, त्यावेळी सिनेसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
अभिनेत्रीने घेतली अशोक सराफ यांची भेट
आता अभिनेत्री तेजश्री वालावलकरने अशोक सराफ यांची भेट घेतली. त्यांची भेट घेतल्यानंतर तिने सोशल मीडियावर अशोक सराफ यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबरच तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. तेजश्रीने लिहिले, “खूप महिन्यांनी अशोक मामांची भेट झाली. प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन शिकवणारी दिग्गज व्यक्ती. मला माझ्या पहिल्या मालिकेत अशोक मामांबरोबर काम करायला मिळाले होते.”
पुढे अभिनेत्री म्हणाली, “त्यांच्या मुलीची भूमिका साकारताना अभिनयातील पैलू कसे असतात याचं शिक्षण अगदी सहजपणे मामांनी दिलं. मामांची प्रत्येक भेट ही भरभरून प्रेम, शिकवण आणि आशीर्वाद देणारी असते. अशा साक्षात विद्यापीठाबरोबर वेळ घालवायला मिळणं आणि काम करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते”, असे म्हणत तेजश्रीने कृतज्ञता व्यक्त केली.
‘उंच माझा झोका’ या मालिकेतून तेजश्रीला मोठी लोकप्रियता मिळाली. तिने साकारलेल्या भूमिकेचे आणि तिच्या सहज अभिनयाचे मोठे कौतुक झाले. ही मालिका २०१२ साली झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली होती. या मालिकेने जवळजवळ वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याबरोबरच तेजश्रीने ‘चिंतामणी’, ‘आजी आणि नात’, ‘मात’ अशा चित्रपटांतदेखील भूमिका साकारल्या आहेत.
आता तेजश्री पुन्हा पडद्यावर कधी परतणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या अशोक सराफ कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मा.मा. या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याबरोबरच, नुकतेच ते अशी ही जमवा जमवी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या देखील प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या.