टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री एरिका फर्नांडिस लवकरच भारत सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होणार आहे. इतर देशातील मनोरंजन क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी एरिकाने हा निर्णय घेतल्याचं म्हंटलं जाट आहे. नुकतंच एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आली आहे. एरिका आता भारत सोडून दुबईमध्ये शिफ्ट होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खुद्द एरिकाने यामागचं कारण सांगितलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये खुद्द एरिका फर्नांडिसने दुबईत स्थायिक होण्यामागचं कारण सांगितलं आहे. ती म्हणते, “मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक वळण येतं जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन काहीतरी नवीन अनुभवायचं ठरवतो. आपल्याला आपलं एक नवीन विश्व निर्माण करायचं असतं. मला नाही माहीत की मी पुन्हा भारतात जाईन की इतर कोणत्या देशात, पण तूर्तास दुबई हे माझं घर आहे.”

आणखी वाचा : “गुजरातीमध्ये ८०% नाटकं…” परेश रावल यांनी केलं मराठी नाट्यसृष्टीचं कौतुक

इतकंच नाही तर एरिकाने नुकतंच तिचं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि ती या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीनकेअर टिप्स देत असते. याच संदर्भात दुबईतील एका मोठ्या ब्रॅंडने यावर काम करण्यासाठी एरिकाला विचारणा केली. त्यामुळे दुबईत येण्यामागचं हे कारणसुद्धा तिथे सांगितलं आहे. शिवाय ती कामानिमित्त तसेच शुटींगसाठी भारतात जाणार आहेच, अभिनय थांबवण्याबाबत तिने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१० मध्ये मॉडेलिंगमधून एरिका फर्नांडिसने स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात केली. याबरोबरच तिने काही दाक्षिणात्य चित्रपटातसुद्धा काम केलं आहे. ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून एरिका घरघरात पोहोचली. एरिकाच्या कुटुंबाचा मनोरंजनसृष्टीशी काहीही संबंध नाही. तिचे वडील बऱ्याच ब्युटि कोंटेस्ट आयोजीत करायचे आणि त्यामुळेच तिला मॉडेलिंगची आवड लागली आणि मग तिने याच क्षेत्रात स्वतःचं करिअर करायचं ठरवलं.