Prajakta Mali Diet Plan : ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत पोहोचली. आजवर प्राजक्ताने आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि निखळ सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे. दिवसभर शूटिंग, व्यग्र शेड्युल या सगळ्यात अभिनेत्री आपल्या आरोग्याची काळजी कशी घेते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना अनेकदा पडतो. आता प्राजक्ताने स्वत: तिच्या डाएट प्लॅनबद्दल खुलासा केला आहे. इतकंच नव्हे तर, सकाळी उठल्यावर उपाशीपोटी तिने एका सुपरहेल्दी ज्यूसचं सेवन केलं, याची रेसिपी सुद्धा प्राजक्ताने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत चाहत्यांना सांगितली आहे.
“मी दोन गोष्टी प्रकर्षाने पाळते. एकतर उत्तम खाणं आणि दुसरं उत्तम दिनचर्या हे दोन्ही फॉलो केलंच पाहिजे. तुम्ही जे अन्न खाता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. तुम्ही मैदा जास्त प्रमाणात खाताय तर, तुम्ही मैद्यासारखे होणारच आहात. त्यामुळे शिळं, पॅकेज फूड वगैरे खाऊ नका. जेवढं ताजं अन्न तुम्ही खाल तेवढा तजेलदारपणा तुमच्या चेहऱ्यावर येईल. शक्य तेवढं लवकर झोपून, पहाटे लवकर उठणं गरजेचं आहे. रात्री २-३ वाजेपर्यंत जागून तुम्ही सुंदर दिसाल असं तुम्हाला वाटत असेल तर, ते शक्य नाही. या सगळ्यात व्यायाम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे.” असं प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी लोकमत सखीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
याशिवाय अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एका हेल्दी ज्युसची रेसिपी शेअर केली आहे. दोन आवळे, १ काकडी, ७-८ Mint Leaves ( पुदिना ), अर्ध लिंबू याचा वापर करून प्राजक्ताने सकाळी उपाशीपोटी पिण्यासाठी सुपरहेल्दी ज्यूस बनवला होता. प्राजक्ता ज्युसची रेसिपी सांगत कॅप्शनमध्ये म्हणते, “दिवसातील पहिला ज्यूस; जो मी उपाशीपोटी प्यायले… #GoGreen”

प्राजक्ताने गेल्या काही वर्षात आपल्या डाएटमध्येही बदल केला आहे. “डाएट प्लॅनविषयी सांगायचं झालं, तर मी शाकाहारी आहे. मी मांसाहार करणाऱ्या लोकांच्या विरोधात नाही त्यामुळे माझ्यावर चिडू नका पण, एक उदाहरण सांगेन. आपल्या शरीरात नॉनव्हेज पचण्यासाठी ७२ तास लागतात. प्राण्यांची पचनसंस्था वेगळी असते आणि माणसांची वेगळी असते. त्यामुळे मला वाटतं नॉनव्हेज हे माणसांसाठी बनलेलं नाही. बरं हे मी सांगत नाहीये…यावर अनेक डॉक्युमेंट्रीज सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. मी आधी नॉनव्हेज खायचे, मग त्यानंतर मी सोडलं.” असा खुलासा प्राजक्ताने केला आहे.
याशिवाय सतत खाऊ नका, कोणतीही गोष्ट खाल्ल्यावर मध्ये दोन तासांचा गॅप पाहिजे. असा सल्लाही प्राजक्ताने चाहत्यांना दिला आहे.
