Premachi Goshta Fame Swarda Thigale Shared A Post : ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचा तिला चांगला प्रतिसाद मिळाला. मालिकेत मुक्ता आणि सागर यांच्या प्रेमाची गोष्ट हळूहळू फुलताना दिसली. मालिकेत सुरुवातीला ती अनेकांची नावडती होती; पण नंतर तिनं तिच्या प्रेमळ स्वभावानं सर्वांची मनं जिंकली आणि सर्वांना आपलंसं केलं. मुक्ता, सागर, सई आणि कोळी कुटुंबीय यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. परंतु, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मालिकेत मुक्ता हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीनं यावेळी तिचा व तिच्या मालिकेतील कुटुंबीयांचा फोटो शेअर केला आहे. स्वरदानं या फोटोंना कॅप्शन देत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीनं यावेळी म्हटलं आहे, “मुक्ता म्हणून मी गेली सहा महिने या मालिकेचा भाग होते. आता या मालिकेला निरोप देण्याची वेळ आली असून, त्यापूर्वी मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मी या मालिकेत एका आईची भूमिका साकारली जी माझ्यासाठी प्रेरणादायी आणि आव्हानात्मक होती”.

स्वरदा भावाना व्यक्त करीत पुढे म्हणाली, “ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यामुळे मला अभिमान आहे की, आम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे काम केलं”. स्वरदानं पुढे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या संपूर्ण टीमला धन्यावाद म्हटलं आहे. यावेळी तिनं ‘स्टार प्रवाह’लाही टॅग करत आणि आभार मानत, “माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे आभार. प्रत्येकाकडून मला खूप काही शिकायला मिळालं”. असं म्हटलं आहे.

स्वरदा मालिकेतील तिच्या प्रवासाबद्दल पुढे म्हणाली, “आता मालिकेचा प्रवास जरी संपत असला तरी यादरम्यानच्या सर्व आठवणी कायम माझ्या मनात राहणार आहेत. त्यानंतर माझ्या वाट्याला काय नवीन येणार आहे यासाठी मी उत्सुक आहे. तुम्हा सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा”.

स्वरदाच्या या पोस्टखाली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सागर म्हणजेच अभिनेता राज हंचनाळेनेसुद्धा इमोजी पोस्ट करीत कमेंट केली आहे. राजसह मालिकेच्या चाहत्यांनीसुद्धा कमेंट्स करत मुक्ताचं कौतुक केलंय. यावेळी “स्वरदाताई तू खूप छान काम केलंस; पण कथा थोडी अजून चांगली दाखवली असती, तर मालिका अजून चालली असती”, “तू लवकर एका नवीन प्रोजेक्टमधून आमच्या भेटीला ये”, “मला ही मालिका खूप आवडली म्हणून आता मालिका संपतेय हे कळल्यानंतर थोडं वाईट वाटतंय; पण आमचं मनोरंजन करण्यासाठी धन्यवाद लव्ह यू”, “इतक्या लवकर का संपवली मालिका” अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू झाली होती. या मालिकेत सुरुवातीला लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने मुक्ता ही मुख्य भूमिका साकारली. नंतर काही कारणांनी अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतली आणि त्यानंतर अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिची मालिकेत मुक्ता म्हणून एन्ट्री झाली. सहा महिन्यांपूर्वीच स्वरदाची मालिकेत एन्ट्री झाली होती. मालिकेतील मुक्ता, सागर यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मुक्ता-सागर, सई, कोळी कुटुंबीय, मुक्ताचे आई-बाबा या सर्व पात्रांनी मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.