Priya Marathe Passes Away : लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेने वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. ३१ ऑगस्टला पहाटे मीरारोड येथील राहत्या घरी प्रियाचं निधन झालं. तिच्या निधनानंतर संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
‘चार दिवस सासूचे’, ‘या सुखांनो या’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रियाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आजारपणामुळे ती गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय नव्हती. ११ ऑगस्ट २०२४ रोजी तिने शेवटची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने पती शंतनूबरोबरचा फोटो शेअर केला होता. या कठीण काळात प्रियाला तिचे जवळचे मित्रमंडळी आणि पती शंतनू मोघे यांनी कायम साथ दिली.
प्रियाच्या निधनानंतर सिनेविश्वातील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या आठवणीत अभिनेता अभिजीत खांडकेकरने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. प्रिया आणि अभिजीत खांडकेकर या दोघांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. प्रियाने यामध्ये खलनायिकेची भूमिका साकारली होती. मात्र, आजारपणामुळे तिने या मालिकेतून एक्झिट घेतली होती.
अभिजीत खांडकेकरची पोस्ट
नावाप्रमाणे सगळ्यांना प्रिय असलेली प्रिया…
अजूनही खरं वाटत नाहीये की, तू आता नाहियेस आमच्यात…
भावपूर्ण श्रद्धांजली, अकाली एक्झिट वगैरे शब्द तुझ्या संदर्भात वापरले जातायत हे पटतच नाहीये मनाला.
आयुष्य इतकं भरभरून जगणारी तू शेवटच्या अवघ्या २ वर्षांत काय-काय सहन करून गेलीस याची कल्पनाही करवत नाही.शंतनू, तू ज्या धीराने तिच्या बरोबर होतास त्याला तोड नाही.
‘लवकर बरी होणार आहेस तू, बरी झालीस की मस्त पार्टी
करू’ असे आमचे खोटे दिलासे शेवटी निरर्थकच ठरले.तू नसल्याची सवय करून घ्यावी लागणार आहे.
तू अजून हवी होतीस प्रिया….
दरम्यान, प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, प्रिया आणि शंतनू यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत एकत्र कामही केलं होतं.