Ram Kapoor Talks About His Wealth : अभिनेते राम कपूर ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतून घराघरात पोहोचला. या मालिकेसह त्यांने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. राम कपूर टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. राम कपूरने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये टेलिव्हिजनवरील कलाकारांच्या मानधनाविषयी वक्तव्य केलं होतं
राम कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतीच त्यांने आलिशान गाडी खरेदी केली होती, तर त्याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. रामने नुकतच एका मुलाखतीमधून त्याच्याकडे इतका पैसा आहे की त्याच्या पुढच्या चार पिढ्यांना तो उपयोगी ठरेल आणि ते त्यांना हव्या त्या सर्व गोष्टी खरेदी करू शकतात असं वक्तव्य केलं आहे.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राम कपूर म्हणाला, “मला आधीपासून गाड्यांची खूप आवड होती. मला चारचाकी आणि दुचाकी या गाड्या खूप आवडतात. माझ्याकडे गाड्यांचं कलेक्शन आहे. मला गाड्यांव्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टींवर पैसे खर्च करायला आवडत नाही.” राम कपूर पुढे म्हणाला, “मला घड्याळ आणि गाड्यांची खूप आवड आहे आणि असे कलेक्शन असणारा मी एकटा नाहीये; असे खूप लोक आहेत, ज्यांच्याकडे या वस्तूंचं कलेक्शन आहे. फरक फक्त हा आहे की ते त्यांच्याकडे असलेल्या गोष्टी दाखवत नाहीत.”
राम कपूर म्हणाला, “मीसुद्धा खरेदी केलेल्या वस्तूविषयी सोशल मीडियावर पोस्ट वगैरे करत नाही. पण, जेव्हा मी लॅम्बोर्गिनी खरेदी केली तेव्हा त्याच्या अनेक बातम्या झाल्या. मी गाडी खरेदी करताना त्या डिलरला सांगितलं होतं की याबाबत माध्यमांना काहीही सांगू नका. पण, त्यांच्याकडे माझा गाडी खरेदी करतानाचा एक फोटो होता आणि त्यांनी जेव्हा तो त्यांच्या वेब साईटवर टाकला, तिथून माध्यमांनी तो फोटो घेतला, त्यामुळे मी कसं त्यांना थांबवणार होतो. पण, मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मी मला हव्या असलेल्या गोष्टी खरेदी करू शकतो.”
या मुलाखतीमध्ये राम कपूरने रोनित रॉय व साक्षी तन्वरबद्दलही वक्तव्य केलं आहे. ता म्हणाला, “टेलिव्हिजनवरील कलाकार चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांइतका पैसा कमवतात असं नाहीये, पण जर तुम्ही सलग ७-८ वर्षे एखादा कार्यक्रम करत असाल आणि टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कलाकारांपैकी असाल तर तुम्हला महिन्याला मिळणारा चेक हा आठ वर्षांच्या कमाईइतका असतो. मी, रोनित रॉय आणि साक्षी आम्ही गेली २० वर्षे टेलिव्हिजनसाठी काम करत आहोत, त्यामुळे आता आम्ही इतके तर पैसे कमावले आहेत की आमच्या ३-४ पिढ्यांना तो उपयोगी ठरेल.”
माध्यमांच्या माहितीनुसार राम कपूरचं मुंबईत महागडं घर आहे, तर गोवा आणि खंडाळा येथे त्याची अमाप संपत्ती आहे. यासह अलिबागमध्ये त्याची २० कोटींची जमीन आहे. राम कपूर गेली अनेक वर्षे टेलिव्हिजनवर काम करत आहे, त्यामुळे आज तो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे.