Television Actress Reacted on Trolling : अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर कलाकारांनी व्यक्त व्हावं, त्यांनीसुद्धा त्यावर त्यांची मतं मांडावीत, अशी अपेक्षा प्रेक्षकांना कलाकारांकडून असते. परंतु, काही कलाकार अशा मुद्द्यांवर थेट प्रतिक्रिया देतात; तर काही त्यावर काहीच वक्तव्य न करणं योग्य समजतात. पण त्यामुळे अशा कलाकारांना काही वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असंच काहीसं छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर घडल्याचं तिनं एका मुलाखतीमधून सांगितलं आहे.
गुजरातच्या अहमदाबाद येथे १२ जूनला विमान कोसळून मोठ्या अपघाताची दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये अनेकांना जीव गमवावे लागले. त्या दुर्घटनेनंतर अनेक कलाकारांनी त्याबाबत सोशल मीडियामार्फत हळहळ व्यक्त केली. परंतु, या संदर्भात आपल्याला काहीच माहीती नव्हती आणि त्यामुळे अभिनेत्री रीम शेखला ट्रोल करण्यात आल्याचं तिनं स्वत: सांगितलं आहे. रीमनें ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.
‘लाफ्टर शेफ’च्या सेटवर असताना अभिनेत्रीला अहमदाबाद विमान अपघाताबद्दल विचारण्यात आलं होतं. पण, याबाबत तिला काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे तिनं कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु, तिचा हा व्हिडीओ तेव्हा खूप व्हायरल झालेला आणि तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं. याबाबत आता अभिनेत्रीनं मुलाखतीमध्ये तिची प्रतिक्रिया दिली आहे.
रीम शेख म्हणाली, “तेव्हा खूप पटकन सगळ्या गोष्टी झाल्या. मी सेटवर आले आणि कोणीतरी मला अचानक काल जे घडलं, त्याबद्दल सांग असं विचारलं. सकाळी ७: ३० वाजता तुम्ही जेव्हा सेटवर येता तेव्हा तुम्हाला तासाभरात तयार व्हायचं असतं. त्यावेळी ४-५ लोक तुमच्यामागे असतात आणि त्यामुळे तेव्हा तुम्ही खूप गोंधळलेले असता. वेळही खूप कमी असतो”.
रीम पुढे म्हणाली, “त्यानंतर मला अनेकांनी ट्रोल केलं; पण माझं हेच मत होतं की, तुम्हाला बोलायचं आहे ते बोला, देशद्रोही म्हणा, ट्रोल करा; पण फक्त मीडियासमोर दु:ख झाल्याच्या भावना व्यक्त केल्या नाहीत म्हणून मला त्या घटनेबद्दल काहीच वाटलं नाही किंवा दु:ख झालं नाही, असं नाहीये. तुम्हाला कदाचित काही माहीतही नसेल की, त्यामुळे आम्ही काय सहन केलं. कारण- माझी स्वत:ची बहीण एअर इंडियामध्ये कार्यरत आहे. जेव्हा विमान अपघाताची बातमी समोर आली तेव्हा मला माझ्या बहिणीबद्दलची विचारणा करणारे १०-१२ कॉल आले”.
ट्रोलिंगबद्दल पुढे रीम म्हणाली, “मला यादरम्यान खूप काय काय बोललं गेलं. अनेक जण सोशल मीडियावर डीएम करत वाईट बोलले, तर काही देशद्रोही म्हणत हिला पाकिस्तानला पाठवा, असं म्हणाले”. अभिनेत्रीनं सांगितलं की, “खूप घाणेरड्या शिव्या दिल्या गेल्या, वाईट बोललं गेलं, सोशल मीडियामधील डीएममध्येदेखील लोक सोडत नव्हते. तेव्हा मी आश्चर्यचकित झाले होते आणि पहिल्यांदाच मी ट्रोलिंग काय असतं याचा अनुभव घेतला”.
रीमच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘तुझसे हैं राबता’, ‘तेरे इश्क में घायल’, ‘फन्ना’, ‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’, ‘इश्कबाज’, ‘यह वादा राहा’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली ते तिच्या ‘तुझसे हैं राबता’ या मालिकेतील भूमिकेमुळे. त्यामध्ये तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती.