Renuka Shahane : आपल्या सुंदर हास्याने सर्वांची मनं जिंकून घेणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ‘उत्तर’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. आजवर त्यांनी असंख्य गाजलेल्या कलाकृतींमध्ये काम केलेलं आहे. मात्र, मध्यंतरीचा असा एक काळ होता जेव्हा रेणुका शहाणे कलाविश्वापासून दूर होत्या. मुलं झाल्यावर त्यांनी इंडस्ट्रीतून काही वर्षे ठरवून ब्रेक घेतला होता. दोन्ही मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांनी टेलिव्हिजनवर काम करण्यास सुरुवात केली पण, १२ तासांहून अधिक काळ रोज शिफ्ट करणं त्यांना जमलं नाही. याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपला अनुभव सांगितला आहे.
रेणुका शहाणे ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “मी जास्तीत जास्त काम टेलिव्हिजनवर केलंय. त्यादरम्यान, टीव्हीवर साप्ताहिक शोऐवजी दैनंदिन मालिका सुरू झाल्या. माझी मुलं जरा मोठी झाल्यावर २००७ मध्ये मी मालिकेत काम करण्याचा एक प्रयत्न केला होता. ‘जिते है जिसके लिए’ या नावाची एक मालिका होती. ती मालिका फार काळ चालली नाही…आणि एका अर्थी ते बरंच झालं. कारण, तो अनुभव फार भयानक होता.”
रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या, “आज जे कलाकार डेलीसोपमध्ये काम करत आहेत त्या सर्वांचं मला खूप-खूप कौतुक वाटतं. कारण, दैनंदिन मालिकांमध्ये कलाकार फार पॅशनने काम करत असतात. एक चूक झाली तरी लोक या कलाकारांना वाटेल तसं बोलतात आणि तरीही हे कलाकार सातत्याने काम करतात. ही गोष्ट खरंच किती मोठी आहे. मी तेव्हा १८-१८ तास काम करत होते. तेव्हा एक गोष्ट जाणवली…नाही हे काम आपल्यासाठी पुरक नाही. त्यामुळे त्यानंतर आतापर्यंत मी मालिकांमध्ये काम केलेलं नाहीये.”
“हळुहळू वेबसीरिजचं युग आलं, माझी मुलंही मोठी झाली. आता मी पुन्हा एकदा काम सुरू केलं….मराठी चित्रपट, हिंदी सिनेमे, वेबसीरिजमध्ये काम करायला लागले. मधला एक काळ असा होता, जेव्हा मला वाटायचं आता मी कुठलं काम करू? जिथे मी घर आणि काम दोन्ही सांभाळू शकते. कारण, यापूर्वी साप्ताहिक शोमध्ये घर आणि काम या दोन्ही गोष्टी मॅनेज करता यायच्या. पण, एखाद्या मालिकेत तुम्ही मुख्य भूमिका करत असाल तर, तुम्हाला रोज काम करणं गरजेचं आहे. महिन्यातले २५ दिवस तरी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं.” असं रेणुका शहाणेंनी सांगितलं.
