Rockys exit from Shiva serial: ‘शिवा’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. शिवा, आशू, पाना गँग, भाऊ, सिताई, बाईआजी, चंदन यांची मोठी लोकप्रियता असल्याच पाहायला मिळते. तर कीर्ती, दिव्या, सुहास ही शिवाविरुद्ध सतत कट-कारस्थान करीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
शिवा मालिकेत दाखविल्याप्रमाणे शिवासाठी तिची माणसं खूप महत्त्वाची आहे. ती त्यांच्यासाठी काहीही करू शकते. अगदी स्वत:ला संकटात टाकण्यापासून ते गुंडाबरोबर मारामारीदेखील ती करते. ती ज्या वस्तीत लहानाची मोठी झाली, त्या वस्तीविषयी तिला अधिक जिव्हाळा वाटतो. पाना गँगमधील मुलं म्हणजे तिच्या आयुष्यातील तिच्या अधिक जवळची आहेत. रॉकी हा त्यातीलच एक होता. परिस्थितीवर मात करीत, त्याने बुद्धीमतेच्या जोरावर यूपीएसीसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवले. त्याच्या यशाचे श्रेय त्याने शिवाला दिले.
रॉकी आणि संपदाचा साखरपुडा ठरला, तेव्हा सर्वांनी आनंद व्यक्त केला. साखरपुड्यासाठी रॉकीला आणण्यासाठी शिवा गेली. मात्र, सुहास व त्याच्या आईने शिवाला जीवे मारण्याचा कट आखला. शिवाला वाचवताना रॉकीचा मृत्यू झाला. त्यानंतर शिवा व संपदा दोघीही दु:खात बुडालेल्या दिसत आहेत. अशा प्रकारे मालिकेतून रॉकीची एक्झिट झाली.
“तुम्ही सगळ्यांनी मला…”
अभिनेता शिवराज नाळेने ही रॉकी ही भूमिका साकारली होती. आता मालिकेतून एक्झिट झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मारुती देसाईंना टॅग करत त्याने लिहिले की, सर, मी तुमचे मनापासून आभार मानतो. कारण- तुमच्यामुळे मला रॉकी साकारायला मिळाला. तसेच, जगदंब व झी मराठी तुमचेही मनापासून आभार तुम्ही मला एवढी मोठी संधी दिलीत. रॉकीच्या प्रवासात एक अभिनेता म्हणून मी खूप शिकलो.
“शिवा थँक्यू! तुझ्याबरोबर काम करायला खूप मजा आली. संपदा पहिल्या दिवसापासून तू सांभाळून घेत मला एकदम सहजरीत्या रॉकी साकारायला मदत केलीस. चंदन तू कमाल एनर्जेटिक आर्टिस्ट आहेस. कळत-नकळत मीदेखील खूप शिकलो तुझ्याकडून. माझी पाना गँग, तुम्ही सगळ्यांनी मला जीव लावला. रॉकीला तुम्ही मोठं केलंत.”
टीममधील इतरांना टॅग करीत अभिनेत्याने लिहिले की, तुम्ही माझे दुसरं घर झाला आहात. खूप प्रेम दिलंत मला, जीव लावला आणि ‘रॉकी’ साकारायला साथ दिलीत. तसेच शिवराजने त्याला या प्रवासात ज्यांनी मदत केली, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. शेवटी त्याने लिहिले, “रॉकी तुमच्याबरोबर आहे.”
दरम्यान, आता शिवा मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच अभिनेता शिवराज नाळे कोणत्या नवी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणेदेखील औत्सुक्याचे असणार आहे.