Pati Patni Aur Panga Winner: टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका जशा प्रेक्षकांच्या आयुष्याच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनतात, तसेच टीव्हीवर प्रदर्शित होणारे रिअॅलिटी शोदेखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात.
बिग बॉस, मास्टरशेफ, इंडिया, खतरों के खिलाडी, सेलिब्रिटी मास्टर शेफ, डान्स इंडिया डान्स, इंडियन आयडॉल, आय पॉपस्टारसारखे अनेक रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यामध्ये कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘पती पत्नी और पंगा’ या शोचे नावदेखील समाविष्ट करावे लागेल. आता नुकताच या शोचा अंतिम सोहळा पार पडला.
‘या’ कलाकार जोडप्याने जिंकली ‘पती पत्नी और पंगा’ची ट्रॉफी
‘पती पत्नी और पंगा’चा हा पहिलाच सीझन होता. आता शो कोणत्या जोडप्याने जिंकला आहे, हे जाणून घेऊ…
‘पती पत्नी और पंगा’मध्ये गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी, स्वरा भास्कर आणि फहाद अहमद, रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला, हिना खान व रॉकी जयस्वाल, सुदेश लहरी व ममता लहरी, गीता फोगाट व पवन कुमार, अविका गोर व मिलिंद चंदवानी, ईशा मालवीय व अभिषेक कुमार असे अनेक कलाकार सहभागी झाले होते.
आता यापैकी एका कलाकार जोडप्याने पहिल्या सीझनची ट्रॉफी स्वत:च्या नावावर केली आहे. या जोडप्याचे नाव रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे जोडपे आहे.
रुबिना आणि अभिनव हे याआधीही बिग बॉस १४ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. अभिनव या शोमधून लवकर बाहेर पडला होता, तर रुबिना या शोची विजेती ठरली होती. रुबिना आणि अभिनवचा मोठा चाहतावर्ग आहे. ज्या पद्धतीने या जोडप्याने बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले, त्याचप्रमाणे ‘पती पत्नी और पंगा’मधून या जोडप्याने प्रेक्षकांची पुन्हा एकदा मने जिंकली.
या शोचे सूत्रसंचालन सोनाली बेंद्रे आणि मुन्नवर फारूकी यांनी केले. या शोमध्ये स्पर्धकांनी विविध टास्क पूर्ण केले. या दरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टीदेखील शेअर केल्या. काही वेळा हे स्पर्धक खळखळून हसताना आणि हसवताना दिसले, तर काही वेळा हे स्पर्धक भावूक होताना दिसले. या शोमध्ये लोकप्रिय अभिनेता अविका गोर आणि मिलिंद चंदवानी यांचे लग्नदेखील पार पडले. या सोहळ्यात या कलाकारांचे कुटुंबीयदेखील सहभागी झाले होते.
दरम्यान, आता ‘पती पत्नी और पंगा’ या शोनंतर हे कलाकार कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
