Marathi Actress on replaced from serial due to her looks: लोकप्रिय ठरलेले, अफलातून भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकणारे कलाकार अनेकदा संघर्ष करीत यशाची पायरी गाठतात. यश मिळण्याआधी ते विविध प्रसंगाना सामोरे जात असतात. कधी नकार पचवावा लागतो, तर काही वेळा काम मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. अनेक कलाकार त्यांचे अनुभव विविध मुलाखतींमध्ये सांगत असतात. आता अभिनेत्री ऋतुजा बागवेने एका मुलाखतीत तिला मालिकांसाठी का नकार मिळायचा, याचा अनुभव सांगितला आहे.

“मला त्यावेळी खूप वाईट वाटलं…”

ऋतुजा बागवेने नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिला अचानक मालिकेतून काढल्याचा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली, “मी आधी मालिकांचे खूप ऑडिशन्स देत होते. त्यात मी फायनल व्हायचे, परत नकार मिळायचा. असं अनेकदा झालं.”

“मला प्रश्न पडायचा की, मला नकार का मिळतो? तर मला असं सांगितलं जायचं की, तू हिरोईन मटेरियल वाटत नाहीस, हिरोईनसारखी वैशिष्ट्ये तुझ्यामध्ये नाहीत किंवा काम छान करतेस; पण तू आम्हाला हवी तशी हिरोईन नाहीयेस, असं मला सांगितलं जायचं.”

“मी विचार केला की, आपण प्रयत्न करत राहायचं. मग मी एक मालिका केली आणि त्या मालिकेतून मला तीन महिन्यांत काढलं. तर मी त्यांना विचारलं की, मला अचानक असं रिप्लेस का केलं? कारण- तुम्ही मला ऑडिशन वगैरे घेऊनच कास्ट केलं होतं. तर मला ते म्हणाले की, आता जी मूळ हिरोईन आहे ती नसणार. तर, त्या पात्राला आम्ही हिरोईन करणार आहोत आणि एक हीरो वगैरेसुद्धा येणार आहे. तुझ्यामध्ये ते हिरोईन फीचर्स नाहीत. तू हिरोईन मटेरियल नाही वाटत म्हणून चॅनेलचं असं म्हणणं आहे की, तुला रिप्लेस करावं.”

“असा एक काळ आला…”

“मला त्यावेळी खूप वाईट वाटलं. वाटलं की बापरे, असंही असतं. आपण खूप जीव लावून काहीतरी करतो आणि कोणीतरी आपल्याला सहज उचलून बाजूला टाकतं. आपण आपलं नाटकच करावं, माझं नाटक कधी मला विचारत नाही की, तू कशी दिसतेस वगैरे. छान काम करत राहूयात. त्यानंतर मी नाटकांतच रमले.”

पुढे अभिनेत्री असे म्हणाली, “आई मला सांगायची तू नायिका होणार, मला माहीत आहे. त्यानंतर असा एक काळ आला की, जेव्हा आपल्या जवळच्या वाटणाऱ्या, घरगुती वाटणाऱ्या तशा नायिका हव्या होत्या आणि मग सुदैवानं मला एक भूमिका मिळाली. तेव्हाही मला दिसण्यावरून ट्रोल केलं गेलं. पण, ती भूमिका, माझं त्यातलं काम ते दोन-तीन महिन्यांनी आवडू लागलं. त्यामुळे लोकांनी मला स्वीकारलं.”

ठनंतर मीसुद्धा प्रयत्न केला की, आणखीन कसं छान दिसता येईल वगैरे आणि मुक्ता बर्वेच्या काही मुलाखती पाहिल्या. तिलासुद्धा या सगळ्याला सामोरं जावं लागलं. तर मी विचार केला की, आपण कोण आहे? आपण तर आता शिकतोय, काम करत राहूयात.”

“मध्यंतरी एक रिजेक्शनला सामोरं जावं लागलं तेव्हाही वाईट वाटलेलं. मला वाईट वाटलं; पण मी हरत नाही. मी काम करत राहते. हिंदी मालिकेत काम केल्यानंतर आता मला फरकच पडत नाही.”

“आता मी स्वत:ला सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आता माझं असं म्हणणं असतं की, तुम्हाला आवडत असेल, तर मला कास्ट करा. नसेल आवडत, तर माझी काही हरकत नाही”, असे म्हटले. अभिनेत्रीने आता लोकांनी दिसण्यावरून भूमिका नाकारल्या, तर वाईट वाटत नाही, असे सांगितले.