Marathi Actor Akash Nalawade Shares Good News : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने नुकतीच सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे. हा अभिनेता लग्नानंतर दोन वर्षांनी बाबा होणार आहे. आजवर अनेक मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याचं नाव आहे आकाश नलावडे. सध्या तो ‘स्टार प्रवाह’च्या ‘साधी माणसं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

आकाश नलावडे ( ८ सप्टेंबर ) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास गुडन्यूज शेअर केली आहे. तो लवकरच बाबा होणार आहे. आकाशची पत्नी रुचिकाने, बॅकग्राऊंडला प्रेग्नन्सी टेस्ट किटचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. रुचिकाने यावर, “आमच्या घरी लवकरच बाळाचं आगमन होणार आहे. आम्ही प्रेग्नंट आहोत…देवा तुझे खूप खूप आभार” असं कॅप्शन दिलं आहे.

रुचिका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “ही आनंदाची बातमी अनेक दिवस आम्ही गुपित ठेवली होती.” यापुढे तिने “Baby Arriving”, “लव्ह”, “आमच्या घरचा नवीन सदस्य” असे हॅशटॅग्ज दिले आहेत. या पोस्टवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. साक्षी गांधी, दिगंबर नाईक यांनी कमेंट्समध्ये प्रतिक्रिया देत आकाश व रुचिका यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आकाश नलावडेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने २०२२ मध्ये रुचिका धुरीसह साखरपुडा केला होता. यानंतर १८ मार्च २०२३ रोजी आकाश आणि रुचिका यांनी लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

अभिनेत्याने यापूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत पश्या ही भूमिका साकारली होती. यानंतर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘साधी माणसं’ मालिकेत त्याला मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री शिवानी बावकर प्रमुख भूमिका सााकारत आहे. ही लोकप्रिय मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाते.