Supriya Pathare Talks About Her Son : गणेशोत्सवानिमित्त बऱ्याच कलाकार मंडळींच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. अनेक कलाकार यानिमित्तानं त्यांच्या इच्छा, आकांशा बाप्पाकडे व्यक्त करत आहेत. अशातच लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनीसुद्धा बाप्पाकडे एक इच्छा व्यक्त केली आहे.

सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं असून त्यांच्या घरच्या बाप्पाला यंदा १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. याबाबत त्यांनी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाबद्दलही सांगितलं आहे. अभिनेत्रीने बाप्पाकडे मुलाबद्दल प्रार्थना केली आहे.

आता घरात सून यावी- सुप्रिया पाठारे

सुप्रिया पाठारे यांना यंदा तुम्ही बाप्पाकडे काय मागणार आहात असं विचारण्यात आलेलं. त्यावर त्या म्हणाल्या, “आता मुलगा वयात आलाय; छान सून यावी घरात आणि त्याच्याआधी तो स्वत:च्या पायावर उभा राहावा. आता तो अमेरिकेत असतो, पण सगळ्यांचं छान व्हावं. त्याने तिकडे स्थायिक होऊ नये, नाही तर इकडचं काही मिळणार नाही. मी आधीच सांगतेय”, पुढे त्या गंमत करत म्हणाल्या, असं काही नाही, त्याचं भविष्य जिकडे उज्वल होत असेल तिकडे राहावं आणि माझ्या घरात येणाऱ्या सर्वांना बाप्पाने सुखी ठेवावं एवढंच माझं म्हणणं आहे.”

सुप्रिया यांना मुलाखतीत यंदा बाप्पाचं कितवं वर्ष आहे याबद्दल विचारण्यात आलेलं. यावर त्या म्हणाल्या, “आमच्या पाठारेंचा बाप्पा माझ्या सासूकडे असतो, पण जान्हवी (त्यांची मुलगी) लहान असताना तिने आपल्या घरीपण बाप्पा पाहिजे असा हट्टंच धरला होता. नाही म्हटलं की ती रडत बसायची, म्हणून मी नवऱ्याला म्हटलं की, गणपतीच आणायचाय ना; असं नाही की आपण काही वेगळं करतोय, छानच गोष्ट असेल घरी बाप्पा आले तर. मग तेव्हा आम्ही दीड दिवसाचा गणपती आणि दहा इंचाची छोटीशी मूर्ती असं आणायला सुरुवात केली.”

पुढे त्या म्हणाल्या, “जशी मुलं मोठी होत गेली, तशी बाप्पाच्या मूर्तीची उंची वाढवत गेलो. आता दोन फुटांची मूर्ती असते, पण मी सांगितलंय की आता यापेक्षा मोठी नको, कारण ही मुलं नंतर परदेशात जातात आणि मग आम्हाला इकडे सगळं करावं लागतं, पण उत्साह एवढा असतो की मज्जा येते.”