‘स्टार प्रवाह’वरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मालिकेत सूर्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी गेल्यावर्षी ही मालिका सोडली. यावेळी त्यांनी मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक आणि सहकलाकारांवर मानसिक त्रास आणि छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी या मालिकेतील निर्माते, दिग्दर्शक आणि सहकलाकारांविरोधात तक्रारही दाखल केली होती. अखेर त्यांच्या या तक्रारीची दखल घेत या मालिकेचे दिग्दर्शक भरत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. विजयादशमीच्या दिवशी हा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला होता. त्यात त्यांनी स्वत:चा विजय झाल्याचे म्हटले होते. तसेच त्यांचे समर्थन करणाऱ्या चाहत्यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले होते.
आणखी वाचा : ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अभिनेत्रीचा मानसिक छळ, निर्मात्यांसह कलाकारांविरोधात केली तक्रार

अन्नपूर्णा विठ्ठल या व्हिडीओत नेमकं काय म्हणाल्या?

“नमस्कार मित्रांनो, आज विजयादशमी. वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा दिवस… आजपासून बरोबर एक वर्षांपूर्वी मी एक मराठी सहकुटुंब सहपरिवार ही मालिका करत होती. त्यात मी त्यांच्या आईची लक्ष्मीची भूमिका साकारली होती. त्यावेळी मला प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. माझा छळ करण्यात आला. मला सेटवर कलाकारांकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळाली होती. त्यानंतर मी सोशल मीडियाद्वारे या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यावर लाखो लोकांनी माझ्याबद्दल सहानभूती दाखवली. अनेकांनी मला समर्थन दिले. त्या लोकांना सोडू नकोस, अशीही भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्यावर निश्चित कारवाई करा.

तुम्ही दिलेल्या या सल्ल्यानंतर मी त्यांना सोडणारी नाही, अशा निश्चय केला होता. त्यानंतर मी त्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत याप्रकरणी चौकशी केली. या चौकशीअंती पोलिसांनी अखेर सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या दिग्दर्शक भरत गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटकही केली. विजयादशमीच्या मुहुर्तावर मी तुम्हाला ही गोष्ट सांगावी, असे मला वाटले. त्यामुळेच मी हा व्हिडीओ शेअर केला. मित्रांनो, वाईटपण कधीही टिकत नाही. सत्य कधीही पराभूत होत नाही.

मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल आणि तुमच्याबरोबर अन्याय होत असेल, तर तो कोणत्याही सहन करु नये. त्याचा विरोध नक्की करा. मी कायमच तुमच्याबरोबर असेन. मी मागे हटले नाही, म्हणूनच मला हा न्याय मिळला”, असे त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या होत्या अन्नपूर्णा?

दरम्यान अन्नपूर्णा विठ्ठल यांनी गेल्यावर्षी शेअर केलेल्या व्हिडीओ दिलेल्या माहितीनुसार, “मराठी सिनेसृष्टीत अमराठी कलाकारांना टिकू दिले जात नाही. मी गेल्या महिन्यात सहकुटुंब सहपरिवार ही मालिका सोडली. मात्र ही मालिका सोडल्यानंतर मला मालिकेतून बाहेर काढण्यात अशी अफवा पसरवण्यात आली. या मालिकेत मला मानसिक त्रास देणे, रॅगिंग करणे यात अभिनेत्यांमध्ये सुनिल बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर आणि दिग्दर्शकामध्ये भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे यासारख्या छोटेमोठे कलाकार यात सहभागी होते. सुनिल बर्वे हा मराठीतील मोठा अभिनेता आहे. पण त्यांनी मला सुरुवातीपासूनच त्रास दिला आहे. इतकच नव्हे तर नंदिता पाटकर आणि किशोरी आंबिये यांनीही मला प्रचंड त्रास दिला,” असे त्यांनी सांगितले होते.

पुढे त्या म्हणाल्या, “मराठी सिनेसृष्टी तुमची आहे का? मग जर हिंदी, तेलुगु कलाकारांनी मराठी सिनेसृष्टी काम करु नये ही मानसिकता ठेवत असाल, तर अशी मानसिकता असलेल्यांनी हिंदी आणि तेलुगु सिनेसृष्टीत काम करु नये. तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे.”
आणखी वाचा : “गणपतीपुळे येथील हॉटेलमध्ये मी स्वतः …” फसवणुकीच्या प्रकरणावर मधुराणी प्रभुलकर स्पष्टच बोलली

सध्या अन्नपूर्णा विठ्ठल या हिंदी मालिकेत काम करत आहेत. गेल्या वर्षभरापासून त्या हिंदी मालिकांमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यंतरी त्या तू चाल पुढं या झी मराठीवरील मालिकेच्या प्रोमोमधून त्या पुन्हा एकदा मराठी मालिकेकडे वळलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र प्रत्यक्षात जेव्हा ही मालिका सुरू करण्यात आली, त्यावेळी अश्विनीच्या सासूच्या भूमिकेत प्रतिभा गोरेगावकर पाहायला मिळाल्या. यामुळे अन्नपूर्णा विठ्ठल यांनी ही मालिका सुरू होण्याअगोदरच सोडली हे उघड झाले. त्यांनी ही मालिका सोडण्यामागचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahkutumb sahaparivar fame laxmi actress annapurna vitthal got justice accuses director share video viral nrp
First published on: 30-10-2022 at 16:40 IST