Samir Choughule Favorite Skit : सध्या टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अनेक कार्यक्रम आहेत. यात सासू-सुनेचा फॅमिली ड्रामा असलेल्या मालिका आहेत, कुकिंग शो आहेत, हॉरर कार्यक्रम आहेत. या मालिकांव्यतिरिक्त काही कथाबाह्य कार्यक्रमसुद्धा आहेत. अशा काही कथाबाह्य कार्यक्रमापैकी एक म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम.
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने प्रेक्षकांना भरभरून हसवण्याचं काम केलं आहे. या शोसह शोमधील कलाकारांनीसुद्धा प्रेक्षकांच्या मनात आपलं घर तयार केलं आहे. शोमधील अनेक विनोदवीरांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे, त्यापैकीच एक म्हणजे समीर चौघुले.
समीर चौघुलेंनी या शोच्या माध्यमातून अनेक विनोदी स्किट्स सादर केले आहेत. त्यातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांची आवडती आहे. त्यांनी सादर केलेले अनेक स्किट्स तर चाहत्यांच्या तोंडपाठदेखील आहेत. मात्र स्वतः समीर यांना त्यांचं कोणतं स्किट आवडतं, माहीत आहे का? चला जाणून घेऊ…
समीर चौघुले यांचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील आवडतं स्किट आहे, त्यांनी साकारलेलं चार्ली चॅप्लिनचं स्किट. याबद्दल स्वतः समीर यांनीच सांगितलं आहे. चाहत्यांशी साधलेल्या संवादादरम्यान, समीर यांना त्यांचं आवडतं स्किट कोणतं? हे विचारण्यात आलं.
याबद्दल ते सांगतात, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधलं माझं आवडतं स्किट म्हणजे चार्ली चॅप्लिनचं. त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली. चार्ली चॅप्लिन माझ्यासाठी देव आहे. त्यामुळे त्यांची भूमिका साकारताना नेहमीच आनंद होतो. त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे. माझं जे काही चाललंय ते त्यांच्या आशीर्वादानेच सुरू आहे.”
दरम्यान, आपल्या विनोदी भूमिकांमुळे चर्चेत राहणारे समीर चौघुले सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे आपले काही फोटो-व्हिडीओ ते शेअर करत असतात. तसंच कामाबद्दलची माहितीही देत असतात. अष्टच त्यांनी चाहत्यांशी मुक्तपणे संवाद साधला आणि या यादरम्यान त्यांना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचे व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.