Samruddhi Kelkar Instagram Video : एखादा कलाकार त्याच्या आयुष्यात नानाविध भूमिका साकारत असतो. डॉक्टर, वकील, पोलिस, इंजिनिअर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचं जगणं ते अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणत असतात. या प्रत्येक भूमिका करताना कलाकाराला त्याचे-त्याचे अनुभव येत असतात. यापैकीच एक महत्त्वाची भूमिका म्हणजे शेतकऱ्याची.

आजवर अनेक कलाकारांनी चित्रपट, नाटक व मालिकांमधून जगाच्या पोशिंद्याची भूमिका पडद्यावर साकारली आहे. शेतकऱ्याची भूमिका करताना प्रत्यक्ष आयुष्यातही शेतकऱ्यांना कोणत्या अड-अडचणींमधून जावं लागतं, याबद्दल याची कलाकारांना जाणीव होते. अशीच शेतकऱ्याची भूमिका करताना प्रत्यक्ष आयुष्यात शेतकऱ्यांना काय सोसावं लागत असेल? याबद्दल एका अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराचं कौतुक होताना दिसतंय, तर मालिकेतील जिगरबाज कृष्णा प्रेक्षकांना विशेष भावतेय. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे समृद्धी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती मालिकेमधील अपडेट्स आणि काही प्रसंग शेअर करत असते.

अशातच तिने सोशल मीडियावर मालिकेत नुकत्याच झालेल्या सीनच्या पडद्यामागच्या क्षणांची खास झलक शेअर केली आहे. सध्याच्या कथानकानुसार, मालिकेत आगीचा सीन पाहायला मिळणार आहे, हा सीन कसा शूट झाला? यासाठी पडद्यामागच्या तंत्रज्ञ मंडळींनी काय मेहनत घेतली? याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह समृद्धीने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

यामध्ये समृद्धी असं म्हणते, “नुकताच मालिकेत – शेताला आग लागते आणि माझी (स्वाती) गाय आगीत अडकते असा सीन होता. यानिमित्ताने पडद्यामागचे काही क्षण आणि अख्ख्या टीमची मेहनत तुमच्याबरोबर शेअर करतेय. काही सीन आगीबरोबर शूट केला; बाकीची आग नंतर ग्राफिक्सने वाढवली. जी तुम्हाला मालिकेत बघायला मिळेल.”

यानंतर ती म्हणते, “शेतकरी – जगाचा पोशिंदा! पावसाच्या आशेवर, वाऱ्याच्या लाटांवर आणि मातीच्या सुगंधावर आयुष्य घडवणारा माणूस. तो संकटांना न घाबरता उभा राहतो. दुष्काळ असो की अतिवृष्टी, महागाई असो की नुकसान… त्याच्या चेहऱ्यावर कधीच तक्रार नसते. असतो तो फक्त काम, कष्ट आणि एक आशेचा किरण!”

यापुढे समृद्धी म्हणते, “मी फक्त मालिकेत त्यांचं आयुष्य दाखवते. पण शेतकरी तो रोज ते जगतो. तोंडावर माती, कपड्यांवर घामाचे डाग आणि मनात मात्र समाधान. कारण त्याच्या हातातल्या बीजांमध्ये आपलं उद्याचं पोट दडलंय. आपलं शेत जळालं ही कल्पना पण सहन होत नव्हती. हे दुःख कोणत्याही बळीराजावर यायला नको हीच प्रार्थना. शेतकऱ्याच्या कष्टांना तोल नाही, तुलना नाही… त्याला मनापासून वंदन आणि सलाम.”

दरम्यान, समृद्धीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती चिखलातून शेतात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गायीला वाचवण्यासाठी ती खऱ्या आगीशी सामना करत आहे. गावकरी तिला या आगीत जाण्यापासून रोखत आहेत, मात्र कृष्णा आपल्या जिवाची कुठलीच पर्वा न करता गायीसाठी आगीचा सामना करत आहे. समृद्धीने शेअर केलेल्या या व्हिडीओमधून तिने या सीनसाठी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. याबद्दल चाहते तिचं कौतुकही करत आहेत.