प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर लवकरच आई होणार आहे. ‘ससुराल सिमर का’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली दीपिका सध्या तिचा गरोदरपणातील काळ एन्जॉय करत आहे. मात्र, यापूर्वी दीपिकाला गर्भपाताचा त्रास सहन करावा लागला आहे. गर्भपातामुळे तिची नेमकी अवस्था काय झाली होती याबाबत एका मुलाखतीत दीपिकाने खुलासा केला आहे.
‘टीव्ही टाइम्स’शी दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली, “पहिल्या गरोदरपणाच्या बातमीने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. आम्ही प्रसूतीची योजनादेखील सुरू केली होती. मी पहिल्यांदाच गरोदर राहिले होते. त्यामुळे मी आणि शोएबसह आमचे संपूर्ण कुटुंब एका वेगळ्या आनंदात होतो. पण जेव्हा गर्भपाताची घटना घडली तेव्हा मला खूप वाईट वाटले. शोएबने मला भक्कम आधार दिला होता. माझ्या गर्भपातानंतर माझ्यासमोर कुटुंबातील कोणताच सदस्य कधीच दु:खी झाला नाही. रुग्णालयातून जेव्हा मी घरी आले तेव्हा मी खूप रडले होते. पण माझ्या सासूबाईंनी मला धीर दिला.”




दीपिका पुढे म्हणाली, “पहिल्या गर्भपातामुळे मला एवढा मोठा धक्का बसला होता की त्यातून बाहेर येण्यासाठी मला बरेच दिवस लागले. माझ्यावर उपचार सुरू होते आणि माझ्या शरीरावर त्याचा परिणाम झाला. दीपिका म्हणाली, अशा परिस्थितीत तुम्ही एकट्याने यातून मार्ग काढू शकत नाही, तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज असते. तुम्हाला तुमच्या नवऱ्याबरोबर असणे गरजेचे आहे.”
दीपिकाने अभिनेता शोएब इब्राहिमशी २०१८मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या पाच वर्षांनी आईबाबा होणार असल्याची गुड न्यूज त्यांनी चाहत्यांना दिली. दीपिकाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने २०१३ साली पायलट रौनक सॅमसनशी लग्न केले होते. परंतु, अवघ्या दोनच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.