गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये विविध घटना घडताना दिसत आहे. त्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गुरुवारी (९ फेब्रुवारी) ज्येष्ठ कलाकार आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून अनेक चाहते भावूक होताना दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा सतीश कौशिक यांचा व्हिडीओ ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेदरम्यानचा आहे. या व्हिडीओ सतीश कौशिक हे ‘तारक मेहता….’ या मालिकेचे सेटवर पोहोचल्याचे दिसत आहे. त्यावेळी त्यांच्याबरोबर दिवंगत अभिनेते आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तवही होते.
आणखी वाचा : सतीश कौशिक यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? जाणून घ्या कारण
या व्हिडीओत सतीश कौशिक हे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील कलाकारांची आणि गोकुलधाम सोसायटीची स्तुती करताना दिसत आहेत. “मी जेव्हा जेव्हा गोकुलधाम सोसायटीला पाहतो ना, तेव्हा माझं हृदय खरोखरंच आनंदी होते. या सोसायटीमध्ये काय एक-एक पात्र राहतात. कोणी इथे राहतं, कोणी तिथे राहतं. जेव्हा भारतात गोकुलधाम सारख्या सोसायटी प्रत्येक ठिकाणी होईल ना, तेव्हा संपूर्ण भारताचा नकाशाच बदलून जाईल”, असे सतीश कौशिक यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.
आणखी वाचा : “तुम्हा सर्वांना…” सतीश कौशिक यांची शेवटची पोस्ट चर्चेत
सतीश कौशिक यांनी केलेली ही स्तुती ऐकून या मालिकेतील सर्वच पात्र जोरजोरात हसू लागतात. त्यावेळी दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही जोरजोरात टाळ्या वाजवताना दिसत आहे. सतीश कौशिक आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा हा व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
दरम्यान अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने ९ मार्चला निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कौशिक यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती.