सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया हा जणू आता आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचा एक भाग झाला आहे. तसंच सोशल मीडिया हे अर्थकारण आणि मनोरंजनाचंसुद्धा एक नवं माध्यम म्हणून उदयास आलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण- या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार मनोरंजन करताना दिसून येतात.

मजेशीर, प्रोत्साहन देणारे किंवा मनोरंजन करणारे व्हिडीओ शेअर करीत ही मंडळी सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धीझोतात येतात. त्यानंतर सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले कलाकार मालिका आणि सिनेमातूनही प्रेक्षकांना पाहायला मिळतात. हिंदीसह मराठी इंडस्ट्रीत सोशल मीडियावरील अनेक लोकप्रिय इन्फ्लुएन्सर मालिका किंवा सिनेमांमधून पाहायला मिळाले आहेत.

सोशल मीडियावर प्रसिद्धीझोतात आलेले हे कलाकार नंतर मालिका व सिनेमांमधून पाहायला मिळाले आहेत. हिंदीसह मराठी इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, जे सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धीझोतात आले. मग मालिका व सिनेमांत पाहायला मिळाले. त्यामुळे या सोशल मीडियावरील स्टार किंवा इन्फ्लुएन्सर्सना कलाकार म्हणावं का, हा प्रश्न कायमच चर्चेत राहिला आहे.

त्याबद्दल आधी अनेकदा चर्चा झाली असून, काहींनी याबद्दल त्यांची स्पष्ट मतं व्यक्त केली आहेत. अशातच आता सविता मालपेकर यांनी सोशल मीडियावरील स्टार्सना कलाकार म्हणून घेतलं जातं. त्याबद्दल आपली भूमिका मांडली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सविता मालपेकर सोशल मीडिया स्टार्सबद्दल बोलल्या असून, त्यांनी याबाबत त्यांची स्पष्ट भूमिका मांडली.

‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत सविता मालपेकर म्हणाल्या, “रील आणि प्रत्यक्षात कॅमेऱ्यासमोर अभिनय करणं यात फरक आहे. आता काय झालं आहे की, रील बघून ठरवायचं की, हा कलाकार आहे. मग जीव ओतून काम करणारे कलाकार आहेत, त्यांनी काय करायचं? मग ही गणितं कशात बसवली जातात, असं वाटतं. मी यावर ठाम नाही. त्यामुळे प्रतिभावान कलाकारांची कोंडी होते.”

कामाच्या बाबतीत मला खंत वाटत नाही : सविता मालपेकर

पुढे त्या म्हणतात, “मला कामाच्या बाबतीत कधीच खंत वाटत नाही. मला छान भूमिका मिळाल्या; पण ज्या मानाने मला पैसे मिळाले पाहिजे होते, तेवढे मला मिळाले नाहीत. कदाचित त्यासाठी माझा स्वभाव कारणीभूत असेल. मला निर्मात्यांकडे पैसे मागता येत नाहीत. ‘मी इतका पर-डे घेईन’ हे मला बोलताच येत नाही. आजही नाही.”

मला स्वत:साठी पैसे मागता येत नाहीत : सविता मालपेकर

त्यानंतर त्या म्हणतात, “मला दुसऱ्यांसाठी काम करता येतं; पण स्वत:साठी पैसे मागता येत नाहीत. याचं कारण म्हणजे मला नाती जपायला आवडतात. मला उत्तम काम करायला मिळालं, माझ्या वाटेला जे काम आलं आहे, ते मला उत्तम करता यायला पाहिजे. पैसा हा माझा निकष नसतो. पैसे मिळतील. नियतीनं जेवढं लिहिलंय, तेवढे मला मिळतील. पण, आता कधी कधी असं वाटतं की, मला बोलायला हवं. कारण- आता वयाच्या ६८ व्या वर्षी मी हे केलं नाही, तर कसं होईल?”