Sulekha Talwalkar talks about mother in law smita talwalkar : सुलेखा तळवलकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अशातच त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या सासुबाई दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्याबद्दल सांगितलं आहे.
सुलेखा तळवलकर यांनी नुकतीच त्यांची मुलं टिया तळवलकर व आर्य तळवलकर यांच्यासह ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलांबद्दल तसेच त्यांच्या सासुबाई अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्याबद्दल सांगितलं आहे. मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सासुबाईंनी त्यांना लग्नानंतर मोलाचा सल्ला दिल्याबद्दल सांगितलं आहे.
सुलेखा तळवलकर यांना सासुबाईंनी दिलेला मोलाचा सल्ला
मुलाखतीमध्ये सुलेखा सासुबाईंबद्दल म्हणाल्या, “माझी सासू नेहमी सांगायची की, तुला जर का तुझ्या मुलांची आणि नवऱ्याची उत्तम काळजी घेतलेली हवी असेल तर तू त्यांच्यावर इतकं प्रेम कर की, तू नसतानासुद्धा सगळं सुरळीत चालेल.”
सुलेखा तळवलकर पुढे म्हणाल्या, “कोणी असं बसवून शिकवत नाही. संस्कार असे घडत नाहीत, पण जे आपण बघतो, म्हणजे स्मिताताईंचंसुद्धा करिअर मी बघितलं आहे. मी त्यांना काकी म्हणते. कारण मी आणि अंबर वय वर्षे १६-१७ असताना भेटलो तेव्हा अंबरची आई, त्यांना घरात सगळे काकी म्हणायचे; त्यामुळे लग्नानंतर अचानक त्यांना आई म्हणणं थोडं विचित्र वाटायचं म्हणून अगदी शेवटपर्यंत मी त्यांना काकीच म्हणायचे.”
स्मिता तळवलकर यांच्याबद्दल सुलेखा पुढे म्हणाल्या, “त्यामुळे स्मिता काकींचं आयुष्य कसं होतं ते मी बघितलेलं आहे. कधीच असं वाटलं नाही की, अरे बाबा स्मिता तळवलकर मला सकाळी उठवतेये. मला बेड टी लागतो, त्या मला स्वत: आणून द्यायच्या. अशा वातावरणात मोठी झाली आहे. १६-१७ वर्षांची असल्यापासून तळवलकरांकडे आहे मी. लग्नसुद्धा लवकरच झालं माझं, त्यामुळे असं कुठेच वाटलं नाही की, अरे हे सासर आहे किंवा हे माहेर आहे.”
सासुबाईंबद्दल सुलेखा तळवलकर पुढे म्हणाल्या, “आता त्यांचा विषय निघाला आहे तर एक किस्सा त्यांच्याबद्दलचा मी सांगते. त्यांची आम्हाला इतकी आठवण येते की, अस्मिता चित्र अॅकाडमीचा एका कार्यक्रम करत होतो मी आणि माझी आई श्रद्धांजलीचा. तेव्हा आम्ही असं ठरवलेलं की, सगळी लोकं जमा होईपर्यंत आपण स्मिता काकींची गाणी लावूयात आणि एका चित्रपटात त्यांची गाणी नव्हती आणि आम्ही विचार करत होतो की, कुठलं गाणं वगैरे; तेव्हा मी माझ्या आईला म्हटलं की मला आठवत नाहीये, तर ती पटकन म्हणाली की अगं वेडी स्मिताला फोन कर ना, म्हणजे त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातसुद्धा आम्हाला असं वाटलं की त्या आहेत.”