Priya Marathe Passes Away: ‘या सुखांनो या’, ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथिया’, ‘चार दिवस सासूचे’ या आणि अशा अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत प्रिया मराठेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अनेक उत्तम कलाकारांबरोबर तिने स्क्रीन शेअर केली.
प्रिया मराठेचे ३८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ती कर्करोगाचा सामना करत होती. तिच्या निधनाने कलाविश्वाला धक्का बसला आहे. अनेक कलाकार त्यांच्या भावना सोशल मीडियाच्या पोस्टमधून शेअर करत आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी व्यक्त केल्या भावना
नीना कुळकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, “प्रिया मराठे म्हणजे उत्तम कलाकार, उत्तम माणूस, मृदूभाषी आणि हसतमुख व्यक्ती. जेव्हा-जेव्हा तुझ्याबरोबर काम केले, तेव्हा तुझ्यातला उपजत चांगुलपणा जाणवायचा. फार लवकर गेलीस. तुला भावपूर्ण श्रद्धांजली”, असे म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

तर ‘ठरलं तर मग’फेम अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरनेदेखील पोस्ट शेअर करत लिहिले, “जी माझ्या सर्वात कठीण काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, त्या मैत्रिणीला मी आज गमावले.”

प्राजक्ता दिघेने लिहिले, “माझी एक गोड व गुणी मुलगी काळाच्या पडद्याआड, भावपूर्ण श्रद्धांजली”, अभिनेत्री समृद्धी केळकरने लिहिले, “प्रिया ताई, तू खूप लवकर हे जग सोडून गेलीस, हे सगळं खोटं आहे असंच अजूनही वाटत आहे”, सुबोध भावेंनीदेखील प्रियाच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. याबरोबरच, सुयश टिळक, गिरीजा प्रभू, मयुरी वाघ अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रिया मराठे व शंतनू मोघे यांनी २४ एप्रिल २०१२ ला लग्नगाठ बांधली. प्रिया अनेकदा शंतनूबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. मात्र, वर्षभरापासून ती सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. वर्षभरापूर्वी तिने शंतनूबरोबरचे काही फोटो शेअर केले होते, तीच तिची शेवटची पोस्ट ठरली. कलाकारांसह चाहत्यांनीदेखील प्रियाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर धक्का बसल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्रीने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील वर्षा या भूमिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. याबरोबरच, तिच्या ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कसम’ या मालिकांमधील भूमिकादेखील विशेष गाजल्या.