Isha Malviya New Car Gifts To Father : आपली मुलं कशामुळे आनंदी राहतील याचा विचार नेहमीच आपले आई-बाबा करत असतात. त्यामुळे मोठं झाल्यावर, आयुष्यात यशस्वी झाल्यावर आपल्या आई-बाबांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं अशी प्रत्येकाची इच्छा असते. लोकप्रिय अभिनेत्रीने आपल्या वडिलांसाठी पाहिलेलं असंच एक स्वप्न नुकतंच पूर्ण झालं आहे. या अभिनेत्रीने आपल्या बाबांसाठी आलिशान गाडी खरेदी करून स्वप्नपूर्ती केली आहे.

हिंदी मालिका, ‘बिग बॉस’चा सतरावा सीझन आणि सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्यात झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री ईशा मालवीयने नुकतीच नवीन गाडी घेतली आहे. मात्र, ईशाने ही गाडी स्वत:साठी नव्हे तर वडिलांसाठी खरेदी केली आहे. काही दिवसांपूर्वी ईशाच्या बाबांनी तिच्याजवळ थार रॉक्स ( Thar Roxx ) ही गाडी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि अभिनेत्रीने तिच्या वडिलांचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे.

नवीन गाडी घेताना ईशा मालवीय आणि तिचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी अभिनेत्रीने वडिलांसह नव्या थार रॉक्सची पूजा केली. यानंतर केक कापून सगळ्या कुटुंबीयांनी एकत्र आनंद साजरा केला.

ईशा या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “पप्पा… आजवर तुम्ही माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. आता तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे.” अभिनेत्रीने वडिलांना गाडी गिफ्ट दिल्यावर तिच्या कुटुंबातील प्रत्येकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सगळ्यांनाच ईशाचा अभिमान वाटत होता. कारण, ईशा अवघ्या २१ वर्षांची आहे. कमी वयात टॅलेंटच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत भरपूर यश मिळवलं आहे.

ईशाने खरेदी केलेल्या थार रॉक्स ( Thar Roxx ) या गाडीची किंमत १२.९९ लाख ते २३.०९ लाखांच्या घरात आहे अशी माहिती फायनान्शियल एक्सप्रेसने दिली आहे.

ईशाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आम्हाला तुझा अभिमान वाटतोय ईशा” अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर गेल्या काही दिवसांपासून ती संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्यामुळे चर्चेत आहे. या गाण्यात ईशाने सुंदर डान्स करत प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं आहे. हे गाणं जगभरात ट्रेंड होत आहे. त्यामुळेच ईशाला अलीकडे सगळेजण प्रेमाने ‘शेकी’ गर्ल म्हणून देखील ओळखतात.