‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने गेले एक-दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. परफेक्ट अभिराम व इमपरफेक्ट लीला यांच्या इमपरफेक्ट लव्ह स्टोरीला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळालं. या मालिकेत अभिराम जहागीरदारला तीन सुना असून, त्या तिघी त्याच्यासाठी दुसरी बायको व त्यांच्या नवीन सासूच्या शोधात होत्या. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, अशी या तीन सुनांची नावं. शेवटी त्यांना सासू सापडली आणि पुढे मालिकेचा मूळ प्रवास सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. आता हा प्रवास खूप पुढे आला असून, ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मुलाखतींमधून यातील कलाकार मालिकेदरम्यानचे अनेक किस्से सांगताना दिसत आहेत.

अशातच मालिकेत दुर्गा हे पात्र साकारणारी अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने नुकतीच ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने या मालिकेमधील एका सीनमागचा किस्सा सांगितला आहे. शर्मिला मालिकेत दुर्गा हे पात्र साकारतेय; तर काही दिवसांपूर्वी मालिकेमध्ये दुर्गा गरोदर असून, नंतर तिचा गर्भपात होतो, असं दाखवण्यात आलं होतं. शर्मिलानं या सीनमागचा किस्सा सांगत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, “हा सीन करताना मला खूप त्रास झाला. अर्थात, मी कधीच माझ्या कुठल्याही भूमिकेचा स्वत:ला त्रास करून घेत नाही. माझ्या स्वत:कडून काही अपेक्षा असतात आणि त्या जर पूर्ण झाल्या नाहीत, तर काम अजून चांगलं करू शकले असते, असं वाटतं तेव्हाच फक्त त्रास होतो. मग झोप लागत नाही.”

“इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा असं झालं की, एक सीन करताना मला प्रचंड त्रास झाला. शारीरिक त्रास झाला. माझं बाळ जातं तेव्हाचा जो सीन होता, त्या दिवशी माझा वाढदिवसही होता आणि तेव्हा मी रडले, रागावले, माझ्यामध्ये जे काही होतं ते सगळं मी त्या सीनमध्ये केलं. पूर्ण ताकद लावून तो सीन केला आणि जेव्हा तो सीन झाला तेव्हा खरोखर माझ्या पोटात दुखत होतं.” पुढे शर्मिला याबद्दल बोलताना म्हणाली, “मी खऱ्या आयुष्यामध्ये अजून आई नाही झाले आहे; पण एक आई म्हणून मला काय वाटेल याबद्दल इतका गहन विचार केला की, त्यामुळे मला शारीरिक त्रास झाला; पण ते सीनमध्ये पोहोचलं. कलाकार म्हणून जेवढी माझी कुवत आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं मला समाधान आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शर्मिलाने या मुलाखतीमध्ये या सीनमुळे तिला मिळालेल्या प्रतिसादाबद्दलही सांगितलं. ती म्हणाली, “या सीननंतर मला अनेक मेसेजेस आले. सेटवरील सगळ्या मंडळींनीदेखील तो सीन खूप छान झाला होता, असं सांगितलं.” दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण, मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रसारित होईल ते अद्याप वाहिनीनं ते जाहीर केलेलं नाही.