Navari Mile Hitlerla Fame Sharmila Shinde Talk’s About Her Breakup : शर्मिला शिंदे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिनं मालिका, नाटक यांमधून काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शर्मिला नुकतीच ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून झळकली होती. त्यामध्ये तिनं महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. अशातच शर्मिलानं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये शर्मिलानं दुर्गा ही भूमिका साकारलेली. या मालिकेसह अभिनेत्रीनं आजवर अनेक मालिकांतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. परंतु, अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं नुकतीच दिलेली मुलाखत. शर्मिलाने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं आहे.
शर्मिला या मुलाखतीमध्ये म्हणाली, “माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल झालेला. आज मी हसतेय या गोष्टीवर; पण तेव्हा खूप दुखावले गेले होते. एका रिलेशनशिपमधून बाहेर पडले होते. तेव्हा मला मुंबईत राहायचंच नव्हतं. त्या प्रसंगानंतर खूप दुखावले गेले होते. त्यामुळे मला एकटं राहायचं होतं. २०१७ नंतर मी एकटीनं राहायला सुरू केलं. मी ठाण्यात शिफ्ट झाले. कारण- मला एकटं राहायला जमायचं नाही. मला असं वाटायचं की, मी लोकांवर अवलंबून आहे”.
शर्मिला याबाबत पुढे म्हणाली, “मी खूप घाबरट होते. रात्री एकटीनं झोपताना मला भीती वाटायची. त्यामुळे नेहमी आई किंवा मैत्रीण कोणीतरी सोबत असावं, असं वाटायचं म्हणून मी मुद्दाम स्वत:ला एकटं केलं. कारण- मला कंटाळा आला होता की, मी किती अवलंबून आहे इतरांवर या गोष्टीसाठी. मला एकटीनं कुठेही जाता यायचं नाही. बाहेर असताना एकटीनं खाताना विचित्र वाटायचं आणि तेव्हाच ब्रेकअप झाल्यानं मला या सगळ्या गोष्टींपासून लांब जायचं होतं”.
शर्मिला एकटीनं राहण्याबद्दल पुढे म्हणाली, “मी एकटीनं राहायला लागल्यानंतर महिनाभर झोपू शकले नाही. तेव्हा मी खूप रडायचे. कारण- मला भीती वाटायची, त्रास व्हायचा; पण त्या एक महिन्यानंतर मी खूप खंबीर झाले. त्यानंतर माझं आयुष्य बदललं. त्यामुळे जेव्हा काही कामच नव्हतं असा काळ होता तेव्हासुद्धा मी खूप बेफिकीर होते. कारण- एकटी राहिल्यामुळे माझ्यात एक वेगळीच शक्ती आली होती”.
“मी सगळ्यांना हाच सल्ला देते की, तुम्हाला जर आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल, ट्रान्स्फॉर्मेशन हवं असेल, तर एकट राहा. एकटं राहून बघा तुम्हाला तुम्ही सापडाल, जशी मला मी सापडले आणि आताही मला कसलीच भीती वाटत नाही”. शर्मिला पुढे ब्रेकअपबद्दल म्हणाली, “मी त्याचा माझ्या कामावर कधी परिणाम होऊ दिला नाही. कारण- माझं माझ्या कामावर खूप प्रेम आहे. सगळ्यात आधी मी कामाला प्राधान्य देते. त्यानंतर माझ्यासाठी इतर गोष्टी असतात. आई-वडील आणि काम या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत”.
“मला कितीही त्रास होत असला तरी अॅक्शन म्हटल्यानंतर मी सगळं विसरते. माझं माझ्या कामावर तेवढं प्रेम आहे. त्यामुळे त्याचा त्रास मला घरी आल्यानंतर व्हायचा; पण सेटवर मी कधीच ते होऊ दिलं नाही की, मला काहीतरी होतंय वगैरे. मला असं वाटतं की, मी एकटीने राहिले म्हणूनच त्यातून बाहेर येऊ शकले. जर मी माणसांमध्ये राहिले असते, तर कदाचित त्यातून पूर्णपणे बाहेर येऊ शकले नसते”.