Shashank Ketkar on Indian Cricket team: भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल कसोटी सामना पार पडला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. भारतीय संघाचे विशेषत:मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा यांच्या गोलंदाजीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

आता अभिनेता शशांक केतकर याने एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताने विजय मिळवल्यानंतर आनंद झाल्याचे त्याने म्हटले आहे. याबरोबरच, भारतीय संघाची दृष्ट काढा, असेही शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शशांक म्हणाला आहे.

शशांक केतकर काय म्हणाला?

शशांक म्हणाला, “खूप छान मॅच झाली. टेस्ट मॅच इतकी उत्सुकता वाढवणारी याआधी कधी पाहिली होती, हे खरंच आठवत नाही. टीम इंडियाला सलाम आहे. या टीमची दृष्ट काढा. प्रत्येकाचा परफॉर्मन्स उत्तम होता. आम्ही शूटिंग थांबवून मॅच बघत होतो. आज ज्यांनी इंग्लंडमध्ये एवढ्या एक दीड तासासाठी सुद्धा तिकीट काढलं असेल ना तर त्यांनी प्रत्येक पैसा योग्य ठिकाणी खर्च केला आहे.

“ही मॅच बघताना थोडं टेन्शन होतं आम्ही एकाच ठिकाणी बसून होतो. शॉटला बोलावल्यानंतर त्यांना सांगितलं की ही मॅच सोडू शकत नाही. थोडं थांबा. आय लव्ह यू टीम इंडिया. कमाल. मला तुमचा अभिमान आहे”, असे म्हणत अभिनेत्याने भारतीय संघाचे कौतुक केले. तसेच मोहम्मद सिराजच्या खेळाचेदेखील कौतुक केले. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने इंडिया असे लिहिले आहे. तसेच त्याच्या व्हिडीओवर भारताचा ध्वज दिसत आहे.

अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. अनेकांनी भारतीय ध्वजाचे चित्र शेअर केले आहे. तर काहींनी भारतीय संघाच्या खेळाचे कौतुक केले आहे.

शशांक केतकर अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या कामाबद्दल बोलत असतो. अनेक सामाजिक समस्यांवरदेखील तो परखडपणे भाष्य करतो. अनेकदा तो काही बाबींबद्दल संतापही व्यक्त करताना दिसतो.

अभिनेत्याने आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या तो मुरांबा या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत त्याने अक्षय ही भूमिका साकारली आहे. रमा-अक्षय यांच्यामध्ये सध्या दुरावा आला आहे. मालिकेत सात वर्षांचा लीप आला. आता सात वर्षांनंतर रमा आणि अक्षय एकमेकांपासून दूर आहेत. त्यांची मुलगी मोठी झाली आहे.

आता मालिकेत पुढे काय ट्विस्ट असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.