Shashank Ketkar Shared A Special Post As Muramba Serial Complited 1100 Episode’s : अभिनेता शशांक केतकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तो गेली तीन वर्षे ‘मुरांबा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा गाठला आहे. यानिमित्त शशांकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
शशांक केतकरने आजवर छोट्या पडद्यावर काम केलेल्या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ‘मुरांबा’ ही त्यातीलच एक. परंतु, ही मालिका अभिनेत्यासाठी खास आहे, याचं कारण म्हणजे आतापर्यंत काम केलेल्या मालिकांपैकी ही त्याची सर्वाधिक भागांची मालिका आहे.
शशांकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने एक खास व्हिडीओ शेअर केला असून, यामध्ये मालिकेतील त्याचे काही फोटो व खास क्षण पाहायला मिळत आहेत. शशांकने याला खास कॅप्शनही दिलं आहे.
अभिनेत्याने कॅप्शनमधून म्हटलं आहे की, “माझी सर्वात जास्त भागांची मालिका. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, नंबर्स, फिगर्स, रेटिंग्स याचा आजवर मला कधीच फरक पडला नाहीये… आणि या पुढेही पडणार नाही. लेखक आणि वाहिनी यांना जोवर एखाद्या गोष्टीमध्ये ताकद आहे असं वाटतं, तोवर घेतलेलं काम मनापासून प्रामाणिकपणे करत राहणं हे माझं कर्तव्य आहे.”
पुढे शशांक म्हणाला, “आज ११०० भागांचा प्रवास पूर्ण झाला. ‘स्टार प्रवाह’ आणि आमच्या निर्मिती संस्थेचे मनापासून आभार. तुमच्या विश्वासाशिवाय आणि सहकार्याशिवाय हे अशक्य होतं.” शशांकच्या या पोस्टखाली मालिकेतील नायिका शिवानी मुंढेकर हिने ‘खूप गोड’ असं म्हणत कमेंट केली आहे.
शशांकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओखाली इतर कलाकारांनीही कमेंट करत त्याला शुभच्छा देत अभिनंदन केलं आहे. शशांक केतकर, शिवानी मुंढेकर, निषाणी बोरुळे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यामधील रमा व अक्षय यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचं पाहायला मिळतं.
शशांकच्या छोट्या पडद्यावरील कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने आजवर ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हा’, ‘सोपं नसतं काही’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘पाहिले न मी तुला’ यांसारख्या मालिकांमध्ये नायक म्हणून मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यासह त्याने काही वेब सीरिज व चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान, शशांक केतकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. यामार्फत तो अनेकदा सामाजिक मुद्दयांवरही त्याचं ठाम मत मांडत असतो, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तो कायम चर्चेत असतो. त्याने पोस्ट केलेले फोटो, व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.