Shashank Ketkar Shared A Video Of His Son : शशांक केतकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अनेकदा तो वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओ पोस्ट यामार्फत शेअर करत असतो. अभिनेता त्याच्या मुलाचे व्हिडीओ व खास फोटोदेखील पोस्ट करत असतो. अशातच आता त्याने त्याच्या मुलाचा एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शशांकने त्याच्या मुलाचा हा व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये अभिनेत्याच्या मुलाने ऋग्वेदने केलेल्या कृतीने साऱ्यांचं लक्ष वेधलं असून यासाठी त्याचं कौतुक होत आहे. शशांकच्या लहानग्या मुलाने स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या झेंड्याचं म्हणजेच तिरंग्याचं चित्र काढलं आहे. यावेळी त्याने स्वत:च्या हाताने तिरंगा बनवला असून तो त्याने त्यांच्या घराच्या बालकनीतील कुंडीत लावल्याचं पाहायला मिळतं.
शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचा मुलगा म्हणतो की, “आज मी तिरंगा बनवत आहे. मला शाळेत पण सांगितलं होतं. माझ्याकडे दोन झेंडे आहेत.” यावेळी तो त्याच्या घरी बाजारातून आणलेला तिरंगा आणि स्वत: घरी बनवलेला तिरंगा दाखवत म्हणाला, “हा झेंडा मी बनवला आहे आणि हा बाजारातून आणलेला रिडीमेड झेंडा आहे. तुम्हीपण हे करून बघा. हॅपी इंडिपेंडन्स डे” असं तो व्हिडीओच्या शेवटी म्हणाला आहे.
शशांकने त्याच्या मुलाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. यावेळी नेटकऱ्यांनी, “किती गोड ते”, “खूप गोड ऋग्वेद बाळा तुला पण हॅपी इंडिपेंडन्स डे”, “छान चित्र काढलं आहे. पण ऋग्वेद कसा दिसतो पाहायला आहे, शशांक दादा त्याचा चेहरा दाखव ना” अशा कमेंट्स केल्या आहेत.

शशांक केतकर अनेकदा त्याच्या मुलाचे व्हिडीओ व फोटो शेअर करत असतो. परंतु, अभिनेत्याने अजून त्याच्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाहीये. तो अनेकदा ऋग्वेदचा चेहरा लपवून त्याने केलेल्या गोष्टी दाखवतो. शशांकने त्याच्या मुलाचं सोशल मीडियावर अकाउंट तयार केलं असून यामधून तो त्याच्या मुलाने केलेल्या गोष्टींचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतो.
शशांकला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. राधा व ऋग्वेद अशी त्यांची नावं आहेत. शशांक त्याच्या मुलांबद्दल अनेकदा मुलाखतींमधून बोलताना दिसतो.
दरम्यान, शशांकच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या ‘मुरांबा’ या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. नुकतच या मालिकेच्या कथानकाने मोठं वळण घेतलं असून मालिकेने ७ वर्षांचा लिप घेतला आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल चर्चा होताना दिसत आहे.