Shashank Ketkar Shares Video : ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील श्री म्हणून सर्वांच्या घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर. सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शशांकने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं कायमच मनोरंजन केलं आहे.

अभिनयाने चर्चेत राहणारा शशांक सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो त्याचबरोबर तो अनेकदा राजकीय व सामाजिक विषयांवरही आपली परखड मतं व्यक्त करताना दिसतो.

रस्त्यावरील खड्डे असो, एखाद्या परिसरातली कचऱ्याची समस्या असो किंवा वाहतुकी संबंधित नियम मोडणे असो… शशांक अशा घटनांवर कायमच त्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आला आहे. त्याच्या या प्रतिक्रियांची प्रशासनाने अनेकदा दखलही घेतली आहे. अशातच शशांकने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.

शशांकने नंबरप्लेट खराब असलेल्या पोलिसांच्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच या व्हिडीओसह त्याने काही प्रश्नही विचारले आहेत. शेअर केलेल्या व्हिडीओत शशांक असं म्हणतो, “आरटीओचे नियम हे सगळ्यांना सारखेच असतात आणि न्यायदेवतेपुढे कोणीही लहान-मोठं नसतं, हे गृहीत धरून मी हा व्हिडीओ शूट करत आहे.” पुढे तो व्हिडीओत पोलिसांची गाडी दाखवत म्हणतो, “आता ही ऑन ड्युटी पोलिस व्हॅन. यावर नंबरप्लेट दिसत नाहीय. उजवीकडे, डावीकडे, वर-खाली कुठेच नंबरप्लेट नाहीय. बिचारी मोडकळीला आलेली ही गाडी आपले पोलिस बांधव चालवत आहेत. पण नंबरप्लेट काही दिसत नाहीय.”

यानंतर तो म्हणतो, “उजवीकडे नंबरप्लेट आहे. पण दुर्दैवाने गंजलेली नंबरप्लेट आहे. आपल्या गाड्यांच्या नंबरप्लेट जर अशा असतील किंवा फॅन्सी असतील, खरंतर त्या असूच नयेत. मी अगदीच त्याविरोधात आहे. पण अशा गंजलेल्या नंबरप्लेट आपल्या असतील तर त्याला चलान लागतं, ज्याचे आपल्याला पैसे भरावे लागतात. माझा प्रश्न हा आहे, या ऑन ड्युटी व्हॅन्सनासुद्धा चलान लागतं का? यांना कोर्ट किंवा ऑनलाइन चलान भरावं लागता का?”

तसंच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तो लिहितो, “माझ्या ज्ञानात भर पडावी म्हणून विचारतोय! शासकीय गाड्यांना, पोलिस व्हॅनला चलान लागतं का? आणि लागलं तर ते भरलं जातं का? त्यांनी सिग्नल मोडला तर चालतं का? माननीय गडकरी साहेबांच्याच गाडीला एकदा चलान भरावं लागल्याचं मी ऐकलं आहे; पण सरसकट सगळ्या नियम मोडणाऱ्या सरकारी गाड्यांना चलान लागतं का?”

यापुढे तो कॅप्शनमध्ये म्हणतो, “जे पोलिस बांधव रस्त्यावर ऑन ड्यूटी आहेत, त्यांच्याच गाडीची ही अवस्था? हे सगळं कुतूहल म्हणून विचारतोय. गैरसमज नसावा. गंमत ही आहे की, आपल्याकडे पोलिसांची भीती घातली जाते. त्यामुळे जरा जपूनच व्यक्त होतोय. नाईलाज आहे.” दरम्यान, या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनीसुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.