Shashank Ketkar Talk’s About Friendship : शशांक केतकर हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. आजवर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या मुरांबा या मालिकेमुळे तो चर्चेत आहे. अशातच अभिनेत्याने नुकतीच मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्याने इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल सांगितले आहे.
शशांक केतकर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. अनेकदा तो त्यामार्फत त्याची मते, प्रतिक्रिया ठामपण मांडत असतो. अशातच अभिनेत्याने आज ३ ऑगस्ट मैत्री दिनानिमित्त इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांबद्दल सांगितले आहे. मुरांबा या मालिकेतील शिवानी मुंढेकर व शशांक केतकर यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली आहे.
मैत्री दिनानिमित्त शशांकला मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीत किंवा इंडस्ट्रीबाहेरचे असे तुझे मित्र, ज्यांनी तुझ्या प्रत्येक कामात साथ दिली, अशा कोणत्या मित्राचा आज तुला उल्लेख करावासा वाटतोस असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शशांक उत्तर देताना म्हणाला, “खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर असे इंडस्ट्रीतले माझे मित्र नाहीयेत खूप”.
मित्रांबद्दल शशांक पुढे म्हणाला, “मित्र आहेत; पण अगदी साथ दिली वगैरे या दृष्टीने सांगायचं झालं तर मग त्यात अनुजा साठे आहे. जी माझी खूप घट्ट मैत्रीण आहे. जिच्याबद्दल मी नेहमीच मुलाखतींमध्ये बोलत असतो की, काहीही झालं तरी अनुजा माझ्यासाठी नेहमी उभी राहील.”
शशांक पुढे म्हणाला, “तिचाच नवरा अभिनेता सौरभ गोखलेही माझा चांगला मित्र आहे. ओमकार कुलकर्णी म्हणून आमचा एक मित्र आहे. सुमित भोकसे आहे. लॉकडाउनमध्ये शूटिंगदरम्यान आम्ही एकाच रूममध्ये राहायचो. त्यामुळे सुमितही चांगला मित्र आहे. असे काही मित्र आहेत.”
शशांक पुढे बायकोबद्दल म्हणाला, “मित्र आहेत; पण मला असं वाटतं की, बायको ही माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे, जिच्याशी मी काहीही बोलू शकतो. वाटेल ते तिला सांगू शकतो.”