Shiv Thakare Birthday Celebration Video : मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात ‘आपला माणूस’ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा कलाकार म्हणजे शिव ठाकरे. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे व निरागस हास्याने शिवने अनेकांची मनं जिंकली आहेत. आपल्या डान्स व दिलखुलास स्वभावामुळे चर्चेत राहणारा शिव सोशल मीडियाद्वारेदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.

सोशल मीडियावर शिव आपले काही फोटो शेअर करत असतो. यासह तो त्याच्या लाडक्या आजीबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. आजी आणि नातवाचे हे व्हिडीओ चाहत्यांच्याही विशेष पसंतीस उतरताना दिसतात. अशातच शिवने त्याच्या सोहल मीडियावर आजीबरोबरचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

शिव ठाकरेने आजवर अनेक रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. काही डान्स रिअॅलिटी शोबरोबरच ‘एमटीव्हीच्या रोडीज’, आणि बिग बॉस मराठी व बिग बॉस हिंदीमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे त्याचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. अशातच आज शिवचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांसह त्याला त्याच्या मित्रांकडून सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत, याबद्दलच्या अपडेट्स शिवने आपल्या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. वाढदिवसानिमित्त शिवची घरच्यांनीसुद्धा त्याचं औक्षण केलं आहे आणि याचे काही खास क्षण शिवने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. त्याने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आई आणि बहीण शिवचं औक्षण करत आहेत.

तसंच पुढच्या स्टोरीमध्ये शिवची आजी त्याची दृष्ट काढत आहे, ज्यामुळे शिव काहीसा भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवच्या आजीचा साधेपणा त्याच्या चाहत्यांना कायमच भावला आहे आणि हाच साधेपणा शिवने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून पाहायला मिळत आहे. आपल्या नातवाला त्याच्या वाढदिवशी कोणतंही महागडं गिफ्ट न देता, मायेने दृष्ट काढली आहे. ज्यामुळे शिवसुद्धा काहीसा भावुक झाला.

दरम्यान, शिव आणि त्याची आजी सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. शिव त्याच्या आजीबरोबरचे काही व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतो. सोशल मीडियावर ही आजी-नातवाची जोडी खूपच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी शिवने त्याच्या आजीसह परदेश दौरा केला होता. विमान आणि महागड्या गाड्यांमधून शिवने त्याच्या आजीला परदेश वारी करून आणली होती.