Shiva Fame Actress Shares Emotional Post: ‘शिवा’ ही मालिका एक अनोखे कथानक, मालिकेतील सकारात्मक व नकारात्मक पात्रे, तसेच कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.
‘शिवा‘ मालिकेतील कीर्ती ही शिवाला त्रास देताना दिसते. शिवा आशूची पत्नी म्हणून त्या घरात असू नये, असे तिला सतत वाटते. त्यामुळे ती सतत शिवाला त्रास देताना दिसते. शिवा व सिताईमध्ये गैरसमज निर्माण व्हावेत, घरात भांडणे व्हावीत, परिणामी शिवा घरच्यांसमोर वाईट ठरावी म्हणून कीर्ती अनेक कारस्थाने करते. या सगळ्यात तिला तिचा पती साथ देतो. कधी दिव्याला हाताशी धरून, तर कधी गुंडांचा आधार घेऊन, तर कधी परिस्थितीचा गैरफायदा घेत कीर्ती सतत कट-कारस्थान करताना दिसते.
देवानं आयुष्याच्या एका वेगळ्याच वळणावर…
मानसी सुरेश या अभिनेत्रीने शिवा मालिकेत कीर्ती ही भूमिका साकारली आहे. आता अभिनेत्री तिच्या भूमिकेमुळे नाही तर तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. मानसीने तिच्या वडिलांसाठी एक भावूक पोस्ट शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. तिने तिच्या वडिलांबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना मानसीने लिहिले, “थोडं अजून थांबायचं ना पप्पा, एवढी घाई कसली होती? बघता बघता चार वर्षं झाली तुम्ही जाऊन. कसे दिवस जात आहेत हे कळतसुद्धा नाही.”
अभिनेत्रीने पुढे लिहिले, “देवानं आयुष्याच्या एका वेगळ्याच वळणावर आपल्याला वेगळं केलं. तुमच्याकडून खूप गोष्टी शिकायच्या राहून गेल्यात. पण, तुम्ही असेपर्यंत जे शिकवलंय, ते आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर उपयोगी पडत आहे.”
“आज खूप जवळची, लांबची माणसं माझं भरभरून कौतुक करतात. पण, तुमच्या तोंडून जिंकलंस पोरी, लय भारी माझी लेक, अशा कित्येक कौतुकानं भरलेल्या शब्दांची कमी कायम भासतेय. बाप म्हणून कधी कुठेच कमी पडला नाहीत आणि माणूस म्हणून कायम लोकांना मदत केलीत. तुमच्याएवढं परफेक्ट जगता, वागता येईल की नाही माहीत नाही. पण, तुम्ही नेहमी सांगता, तसे प्रयत्न करीत राहीन.”
“पप्पा, तुम्हाला जाऊन कितीही वर्षं होऊ दे. तुम्ही माझे देव आहात आणि देव या जगाच्या कानाकोपऱ्यात आहे आणि राहील. जोपर्यंत तुम्ही आहात, तोपर्यंत माझं काहीही वाईट होणार नाही.”
शेवटी मानसीने लिहिले, “तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे तुमची बरीच स्वप्नं पूर्ण करायची आहेत आणि करेनच. काळजी घ्या. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो.”
अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवा या मालिकेत अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून वेळोवेळी कौतुक होत असल्याचे पाहायला मिळते.